अनुजच्या हत्त्येचे ब्रिटीश संसदेत पडसाद

पुण्याच्या अनुज बिडवेची इंग्लंडमध्ये वर्णभेदावरून हत्या झाल्यानंतर इंग्लंडच्या संसदेनं त्याबाबत अहवाल मागितलाय. याबाबत हाऊस ऑफ कॉमन्सच्या गृह विषयक कमिटीचे अध्यक्ष आमि मजूर पक्षाचे खासदास केथ वाझ यांनी या घटनेचा निषेध केलाय.

Updated: Dec 29, 2011, 02:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, लंडन

 

पुण्याच्या अनुज बिडवेची इंग्लंडमध्ये वर्णभेदावरून हत्या झाल्यानंतर इंग्लंडच्या संसदेनं त्याबाबत अहवाल मागितलाय. याबाबत हाऊस ऑफ कॉमन्सच्या गृह विषयक कमिटीचे अध्यक्ष आमि मजूर पक्षाचे खासदास केथ वाझ यांनी या घटनेचा निषेध केलाय. परदेशातल्या विद्यार्थ्यांना पुर्ण सुरक्षा मिळायला हवी असं त्यांनी सांगितलं.

या प्रकऱणी मँचेस्टर पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केलीय. २३ वर्षीय अनुज बिडवेची जवळून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर इंग्लंडमधल्या भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे. हत्येमागं वर्षद्वेषाची शक्यता पोलिसांनी फेटाळलेली नाही. अनुज लँकशायर युनिव्हर्सिटीचा  विद्यार्थी होता. सध्या ब्रिटनमध्ये ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टची धूम आहे. त्यामुळे बिडवे कुटुंबीयांवर झालेल्या आघातावर लक्ष द्यायला ब्रिटनमध्ये कुणालाच वेळ नाही. त्याचा मृतदेह ताब्यात मिळायला किती दिवस लागतील, हेही सांगता येत नाही.

 

या हत्त्येनंतर अनुजचे कुटुंबीय आणि मित्र भारतीय दूतावास आणि ब्रिटीश प्रशासनाच्या संपर्कात आहेत. अनुजच्या मारेकऱ्याचा शोध सुरु असल्याचं ब्रिटन पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे. अनुजची हत्या करणारे सापडतीलही पण बिडवे कुटुंबीयांना त्यांच्या काळजाचा तुकडा परत मिळणार नाही. आता किमान अनुजचा मृतदेह लवकर मिळावा, यासाठी सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही हत्या वर्णद्वेषातून झाली असल्यास त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.