अमेरिका: गुरूद्वारामध्ये बेछूट गोळीबार, ७ ठार

अमेरिकेतल्या ओकक्रिक शहरातल्या गुरद्वारामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे... या घटनेत ७ ठार तर पंचवीसजण जखमी झाले आहेत.

Updated: Aug 6, 2012, 08:16 AM IST

अमेरिकेतल्या ओकक्रिक शहरातल्या गुरद्वारामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे... या घटनेत ७ ठार तर पंचवीसजण जखमी झाले आहेत. अमेरिकन वेळेनुसार सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये घुसून बेछूटपणे गोळीबार सुरु केला. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार तीन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला.

 

यावेळी या हल्लेखोरांनी गुरुद्वारात दर्शनासाठी आलेल्या शंभराहून अधिक नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. यात लहान मुलांचाही समावेश होता. घटनेनंतर अमेरिकन तपास यंत्रणा आणि पोलीस यांनी गुरुद्वारामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुरु केलं. निम्म्या गुरुद्वारामध्ये असलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत एक हल्लेखोर ठार तर एक पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

 

हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांची सुटका करुन त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर हल्लेखोरांनी लहान मुलांना ओलीस ठेवलं. दरम्यान या घटनेची भारत सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी अमेरिकेतील भारताच्या राजदूत निरुपमा राव यांच्याशी चर्चा केलीय. दरम्यान ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची सुटका करण्यात एफबीआयला यश आलं आहे.