www.24taas.com, लंडन
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना परदेशात जायचे असेल तर आता शक्य होणार नाही. कारण अमेरिकेपाठोपाठ आता ब्रिटननेही मोदींना देशात यायला बंदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ब्रिटन सरकार आता परदेशी पाहुण्यांबाबत नवीन नियमावली तयार करत आहे.
गुजरात दंगलीनंतर मोदींची प्रतिमा मलिन झाली आहे. मोदींसारख्या व्यक्तींना लांब ठेवण्यासाठी अशाप्रकारचे नियम होणे आवश्यक आहे, असे मत मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या नियमांनुसार युरोपीय संघाचे सदस्य नसलेल्या देशातील मानवाधिकार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ब्रिटनमध्ये येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. जर, असे झालेच तर मोदींवरदेखील बंदी येऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मोदी यांना ब्रिटनमध्ये येण्याची परवानगी २००३ मध्ये देण्यात आली होती. त्याला मोठा विरोध झाला होता. २००५ मध्ये दक्षिणेकडील काही संघटनांनी मोदी यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणीदेखील केली होती. त्यामुळे मोदींनी आपला ब्रिटन दौरा रद्द केला होता.