www.24taas.com, कॅलिफोर्निया
कॅलिफोर्निया येथील एका पादत्राणं बनवणाऱ्या कंपनीने पादत्राणांवर गौतम बुद्धांची प्रतिमा असणाऱ्या चपला, बुटांची नवी डिझाइन्स बाजारात आणल्यामुळे जगभरातील बौद्ध समाजातील लोकांनी निषेध नोंदवला आहे. या निषेधाला आंदोलनाचं स्वरूप येऊ लागलं आहे. फेसबूकवरून या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे.
बुद्धाच्या प्रतिमा बऱ्याच ठिकाणी सौंदर्य आणि शांतीचं प्रतिक म्हणून वापरल्या जातात. अनेक लेण्यांमध्ये बौद्ध प्रतिमा आढळून येतात. अशा गौतम बुद्धाची चित्रं पादत्राणांवर चित्रित करणं खेदजनक असल्याचं आंतरराष्ट्रीय तिबेटियन कॅम्पेन चालवणाऱ्या भुचुंग सेरिंग यांच म्हणणं आहे.
गौतम बुद्धांची चित्रं असणाऱ्या पादत्राणांवर बंदी घालण्यात यावी, अशी तिबेटियन बौद्ध संघटनांची मागणी आहे. अशा प्रकारे देवतांची चित्रं चपलांवर असणं हे संवेदनहीनतेचं लक्षम असल्याचं काही बौद्ध भिक्षूंचं म्हणणं आहे. या कंपनीने अशी पादत्राणं बनवणं बंद करावं आणि आपल्या वेबसाइटवर जाहीर माफी मागावी असीही उत्तर अमेरिकेतील एका नेत्याने मागणी केली आहे.