www.24taas.com, वॉशिंग्टन
पुण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकलाय. पुण्यातल्या केतकी देसाई या मुलीच्या शिक्षणविषयक प्रकल्पाला अमिरेकेत पहिलं पारितोषिक मिळालंय. केतकीनं तिच्या सहका-यांसह साकारलेल्या प्रकल्पाची हल्ट ग्लोबल केस चॅलेंज स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झालीय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
मूळची पुण्याची असलेली केतकी सध्या अमेरिकेतल्या कार्नेजी मेलन विद्यापीठात सार्वजनिक धोरण व्यवस्थापनाचं पदव्युत्तर शिक्षण घेतेय. शिक्षण, उर्जा आणि गृहबांधणी यापैकी कुठल्याही एका विषयावर केस स्टडी सादर करण्याच्या स्पर्धेत तिचा गट सहभागी झाला होता. वन लॅपटॉप पर चाईल्ड या प्रकल्प केतकीच्या गटानं सादर केला. आफ्रिकेतल्या देशांत ओएलपीसी म्हणजे वन लॅपटॉप पर चाईल्डसारख्या योजनेला मर्यादित यश का मिळतं, आणि जगभरातल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप कसे मिळतील, या विषयीचा अभ्यास प्रकल्प सादर करण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे या स्पर्धेचे परीक्षक होते, तर बिल क्लिंटन यांनी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. आत्मविश्वास आणि मेहनतीतून केतकीला हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिच्या आईनं दिलीय.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जगातल्या चार हजार विद्यापीठांमधले स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून निवडण्यात आलेल्या अठरा स्पर्धकांमध्ये केतकीचा गट अव्वल ठरलाय. केतकी या विषयावर यापुढेही काम सुरू ठेवणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल तिला 10 लाख अमेरिकन डॉलरचं पारितोषिकही मिळालंय.