मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खानचं पुन्हा एकदा मराठी सिनेमाबद्दलचं प्रेम दिसून आलं. कारण या सिनेमाबरोबर आमिर एका मराठी सिनेमाचंही प्रमोशन करणार आहे.
बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांचे सध्या रिअॅलिटीशोच्या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं जातं. मात्र, प्रमोशनच्या या शर्यतीत मराठी सिनेमाही आता आघाडी घेताना दिसतोय. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची खुद्द मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दखल घेतली आहे.
मराठी सिनेसृष्टीत ‘सैराट’ या सिनेमाने चांगलाच धूमाकूळ घातला होता. एव्हढचं नाही तर बॉलिवूडलाही सैराटची भूरळ पडली होती. आमिरनंदेखील ‘सैराट’, ‘नटसम्राट’ आणि ‘कोर्ट’ या मराठीतील चित्रपटांचे कौतुक केले होते. ‘सैराट’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रादेशिक सिनेमांना उत्तम व्यासपीठ मिळाले पाहिजे, असे म्हणणाऱ्या आमिरने आपला आगामी ‘दंगल’ हा सिनेमा प्रदर्शित करताना एका मराठी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभाग नोंदविला.
'दंगल’ पाहताना आपल्याला ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर बघायला मिळणार आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळण्यासाठी आमिरने मराठीतील ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या 'दंगल' या सिनेमाबरोबर कतरिना कैफ आणि रणबीर कपूर स्टारर आगामी ‘जग्गा जासूस’ या या सिनेमाचा ट्रेलर दाखविण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र ‘दंगल’ पाहताना आता मराठी चित्रपटाचा ट्रेलर दिसणार असल्याचं स्पष्ट झालंय.
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या ६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि ‘होणार सून मी या घरची’मधून घराघरांत पोहोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हाही या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झालाय. तर झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. आमिरच्या ‘दंगल’ या बहुचर्चित चित्रपटाबरोबर मराठी चित्रपटाला प्रसिद्धी मिळणे ही मराठी चित्रपटासाठी अभिमानाचीच गोष्ट असेल. त्यामुळे या सगळ्याचा 'ती सध्या काय करते'ला कितपत फायदा होतो हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेल.