मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?
तो चेहरा कोणाचा होता? आणि आत्ता हे का समोर येतंय? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर हा चेहरा होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचा म्हणजेच अमित ठाकरे यांचा... आणि हे नुकतंच खुद्द राज ठाकरेंनीच सांगितलंय.
'महेश मांजरेकरांनी एकदा फोन करून अमितला चित्रपटातून लॉन्च करायचं म्हटलं होतं... चित्रपटाचं नाव विचारलं तेव्हा म्हणाले 'एफयू'... हे चित्रपटाचं नाव आहे की मला उद्देशून म्हटलं होतं हेच मला पहिल्यांदा कळलं नाही... त्यामुळे पुढच्या वेळी 'शुभंकरोती'सारखं काही आलं तर विचार करू असं म्हटलं' असं सांगत राज ठाकरे यांनीच अमितच्या चित्रपट क्षेत्रातील पदार्पणाच्या चर्चेचं बिंग फोडलंय.
'एफयू' हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आलाय. ठाकरेंचा होकार मिळाला असता तर आकाशऐवजी अमित रॉकस्टारच्या भूमिकेत दिसला असता. असो...