जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा अभिनेता सलमान खान यानं केलाय. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून घटना घडली तेव्हा आपण हॉटेलमध्येच होतो, असं सलमाननं म्हटलंय.
काळवीट शिकार प्रकरणी सलमानसह इतरांवर जोधपूर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात आपण आणि आपल्या साथीदार अभिनेत्यांनी कधीच शिकार केली नसल्याचा जबाब सलमान खाननं नोंदवला.
यावेळी सलमानला एकंदर 65 प्रश्न विचारले गेले. त्यांना उत्तर देताना सर्व साक्षी आणि तपास खोटा असल्याचा दावा सलमान खाननं केला. इतकंच नाही, तर वन विभागानं पब्लिसिटी मिळवण्यासाठी आपल्याला फसवल्याचं सलमाननं दावा केलाय.
चित्रिकरण संपवून सर्व जण हॉटेलवर परतत होते. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यावेळी आम्ही बाहेर फिरूही शकत नव्हतो, असं सलमाननं सांगितलं.
सलमानसह सैफ अली खान, तब्बू आणि सोनाली बेंद्रे आणि निलम यांचेही जोधपूर न्यायालयात यावेळी जबाब नोंदवले गेले. या प्रकरणात सलमान मुख्य आरोपी आहे.
1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान जोधपूरजवळ कांकाणी गावात सलमाननं दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यावेळी, त्याच्यासोबत जीपमध्ये सैफ, सोनाली, तब्बू आणि नीलम हेदेखील होते. त्यांच्यावर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.
यापूर्वी 18 जानेवारीला जोधपूरच्या सीजीएम न्यायालयाने आर्म ऍक्ट केसमधून सलमान खानची मुक्तता केली आहे. काळवीट शिकार गुन्ह्यावेळी सलमानवर आणखी तीन गुन्हेही नोंदवण्यात आले होते. त्या खटल्या संदर्भात आता जबाब घेण्याची प्रक्रिया सुरु झालीय.