सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू

‘एलिझाबेथ एकादशी’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Updated: May 1, 2017, 08:23 AM IST
सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू title=

मुंबई : ‘एलिझाबेथ एकादशी’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. 

वर्षाच्या सुरुवातीलाच ‘ती सध्या काय करते’ या यशस्वी चित्रपटानंतर झी स्टुडिओज् निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चि. व चि. सौ. कां. हा लग्नबंबाळ, धमाल गोतावळा तसेच सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट १९मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर एक अनोखा ट्रेलर लॉन्च सोहळा काल एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. या सोहळ्याला दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, नामवंत गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आणि चित्रपटाची पूर्ण टीम आदी मान्यवर उपस्थित होते. 

चित्रपटाची कथा आहे सत्यप्रकाश आणि सावित्री यांची. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. दोघेही विचारांवर ठाम व कामात मग्न. घरच्यांचा आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील. त्या दोघांच्या ओळखीचे एक जोडपे नुकतेच वेगळे झालेले असते. 

प्रेमात आकंठ बुडालेली ती जोडी महिन्याभरातच एकमेकांना वैतागून तुटलेली असते. त्यापासून धडा घेऊन सावित्री - सत्यप्रकाश एक विचित्र निर्णय घेतात आणि त्यांचे कुटूंबिय व मित्रांची एकच भंबेरी उडते. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर याचा हा पदार्पणातला चित्रपट आहे.

याप्रसंगी दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, "श्री व सौ होण्याच्या प्रवासात, थेट चंद्र सूर्याच्या उपमा देऊन प्रेम करणारे, लग्नानंतर एकत्र राहायला लागल्यावर एकमेकांना चंद्रा - सूर्यावर पाठवायला उदयुक्त होतात. लग्न झालेला 'जोडा' तयार झाला की आजकाल खूप लवकर झिजू लागतो. ह्यावर उपाय काय ? त्याचा शोध म्हणजे चि. व चि. सौ. कां."

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड आणि चित्रपटाचे निर्माते निखिल साने म्हणाले,"मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांच्या लेखणीतून साकारलेली ही धमाल कौटुंबिक कथा, तसेच परेशने त्याच्या शैलीत दिग्दर्शित केलेली प्रेमकथा ही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल याची मला खात्री आहे."

झी स्टुडिओज् चे निखिल साने यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पुर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष आणि सतीश आळेकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे. 

या चित्रपटात एकूण दोन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे आणि शब्दबद्ध केली आहे परेश मोकाशी यांनी. यात ‘चि. व चि. सौ. कां.’ हे अकापेला धाटणीचे म्हणजेच गाण्यात कोणतेही वाद्य न वापरता वाद्यांचे आवाज फक्त तोंडाने काढलेले गाणे स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. 'मन हे' हे गाणं लिहिलंय स्वरबद्ध केलंय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत. चित्रपटासाठी कल्याणी गुगळे यांनी वेशभूषा केली आहे तर रंगभूषा संतोष गिलबिले यांनी. संकलन अभिजीत देशपांडे यांनी केलंय आणि अनमोल भावे यांनी ध्वनी संयोजन केले आहे. चित्रपट आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी.

सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या दोन्ही टिझरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा येत्या १९ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. वर्षाच्या सुरूवातीलाच “ती सध्या काय करते” सारखा हिट चित्रपट देणा-या झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास सज्ज झालाय.