'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!

मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय. 

Updated: Aug 20, 2015, 10:07 PM IST
'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले! title=

मुंबई : मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय. 

मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला-वहिला 'अजिंक्यतारा' हा पुरस्कार कार्यक्रम २१ ते २३ ऑगस्टला मॉरिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर या भव्य सभागृहात  पार पडणार होता. सुपरविस्टा एन्टरटेनमेंटने या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. तर अभिनेत्री सई ताम्हणकर हिची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती. 

या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक परफॉर्मन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू होती. मानसी नाईक, अमृता खानविलकर, पूजा सावंत, अभिजीत केळकर, नेहा पेंडसे यासारखे अनेक आघाडीचे कलाकार कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. परफॉर्मन्सची तयारी झाली.... तालमी झाल्या... बॅगा भरल्या गेल्या... आणि सगळे विमानतळावरही दाखल झाले. 

आज सकाळी ७.४५ च्या फ्लाईटनं जवळपास ८० कलाकारांची टीम मॉरिशिअसला प्रस्थान करणार होती... रात्री अडीच-तीन वाजल्याच्या सुमारास सगळे कलाकार विमानतळावर दाखलही झाले. चेकींग वगैरे सोपस्कारही पार पडले... आणि अचानक चारच्या सुमारास सगळ्यांच्या मोबाईलवर पुरस्कार सोहळा रद्द झाल्याचे मॅसेज धडकले. त्यामुळे, या सर्व कलाकारांना एकच धक्का बसला. कार्यक्रम का रद्द करण्यात येतोय याचं कारण मात्र कलाकारांना देण्यात आलं नाही.

आयोजकांनी अशा पद्धतीनं आपला अपमान केल्याची भावनाच मराठी कलाकारांनी बोलून दाखवलीय. आपली मेहनत वाया गेल्याचं दु:ख वेगळंच... कलाकारांना गृहित धरण्याच्या या मानसिकतेबद्दल अभिनेता अभिजीत केळकर यानं नाराजी व्यक्त केलीय. 

आयोजकांपैकी मुख्य असलेल्या 'सिनेयुग' कंपनीनं अचानक माघार घेतल्यानं हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात येतंय. या पुरस्कर सोहळ्यासाठी ‘सिनेयुग ग्रुप ऑफ कंपनी’ इव्हेंट मॅनेजमेंट पार्टनर होती तर ‘किड्झेनिया’ मुंबई वेन्यू पार्टनर म्हणून काम पाहणार होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.