मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे. पण असे मराठीत असे पाच अजरामर चित्रपट होऊन गेले त्यांचीही एन्ट्री ऑस्करसाठी झाली असती.
पाच मराठी चित्रपट ज्यांची झाली असती ऑस्कर वारी
१) सामना : जब्बार पटेल दिग्दर्शित सामना हा चित्रपट १९७४ रोजी प्रदर्शित झाला. विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून निघालेल्या या कलाकृतीत मोहन आगाशे, निळू फुले, श्रीराम लागू आणि स्मिता पाटील यांनी जबरदस्त भूमिका वठविल्या होत्या. हा चित्रपट २५ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला होता.
२) सिंहासन : हा देखील जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट असून राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट आहे. आजही हा चित्रपट पाहिला तर राजकीय परिस्थिती बदलली नाही. याची प्रचिती येते. अरूण साधू यांच्या कांदबरीवर आधारीत या सिनेमाचे लेखन विजय तेंडुलकर यांनी केले आहे.
या चित्रपटात निळू फुले यांनी मध्यवर्ती पत्रकाराची भूमिका निभावली होती. अरूण सरनाईक, श्रीराम लागू, रिमा लागू, मोहन आगाशे आणि नाना पाटेकर यांच्या दमदार अभिनयांनी या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.
३) पिंजरा : मराठीतील ग्रेट शो मॅन व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटाने मराठी रसिकांच्या मनाला भूरळ घातली होती. १९७२मध्ये प्रदर्शीत झालेला हा चित्रपट नंतर हिंदीतही प्रदर्शित करण्यात आला. श्रीराम लागू आणि संध्या यांची यात प्रमुख भूमिका होती.
एक शिक्षक तमाशा कलावंतीणीच्या प्रेमात पडतो आणि त्याची काय अवस्था होते, याचे चित्रण करणारा हा चित्रपट होता.
राम कदम यांचे संगीत आणि जगदीश खेबूडकरांचे गीतांनी मराठी रसिकांना वेडं केलं
४) श्यामची आई - श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
५) चौकट राजा - चौकट राजा हा इ.स. १९९१ साली पडद्यांवर झळकलेला एक मराठी चित्रपट आहे. संजय सूरकर याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.