मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांनी जिच्यासाठी 'जुम्मा... चुम्मा दे दे' गायलं ती अभिनेत्री किमी काटकर आठवतेय का हो? कदाचित आठवणारही नाही... मग ती कुठेय आणि काय करतेय... याची तर किंचितशीही कल्पना नसेल...
किमी काटकरनं वयाच्या १७ व्या वर्षी मॉडलिंग करिअरमध्ये एन्ट्री घेतली होती. साहजिकच लवकरच तिला पहिला ब्रेक मिळाला तो 'पत्थर दिल' या चित्रपटातून... हा सिनेमा मात्र फ्लॉप ठरला
यानंतर आला किमीचा दुसरा चित्रपट... टार्जन... या सिनेमातला तिचा ग्लॅमरस आणि आकर्षक लूक मात्र लोकांच्या पसंतीस पडला.
आपल्या करिअरमध्ये किमीनं त्याकाळचे बडे स्टार म्हणजेच जितेंद्र, अनिल कपूर, गोविंदा यांच्यासोबतही काम केलं. गोविंदासोबत किमीच्या जोडीला लोकांचीही पसंती मिळाली.
पण, तिला खरी ओळख मिळाली ती अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'हम' या चित्रपटातून... १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातलं गाणं 'जुम्मा-चुम्मा' हे गाणं भलतंच हिट झालं.
पण, अचानक किमी चित्रपटांतून गायब झाली... याच दरम्यान तिच्यासमोर प्रसिद्ध फोटोग्राफर शांतनु यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. किमीलाही शांतनु आवडत होते... त्यामुळे तिनं होकार द्यायला फारसा वेळ घेतला नाही... आणि लवकरच दोघं विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या संसाराच्या वेलीला एक फुलही उमललं.
आपल्या सांसारिक आयुष्यात बिझी असतानाच किमीच्या मुलाला एक गंभीर आजार असल्याचं समजलं. या आजारावर उपचारासाठी किमीला ऑस्ट्रेलियाला जावं लागलं. आपल्या मुलासाठी किमीनं आपल्या करिअरवर पाणी सोडलं... ग्लॅमरचं जग सोडून ती अंधारात हरवली...
मुलाची तब्येत सुधारल्यानंतर किमी पुन्हा भारतात परतली... पण, बॉलिवूड नगरी मुंबईत स्थिरावण्यापेक्षा किमीनं पुण्यात राहणं पसंत केलं. त्यानंतर किमी आजपर्यंत बॉलिवूडमध्ये दिसलेली नाही.