उमेश जाधव, झी मीडिया
Beed Murder Update: बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील वाल्मिक कराडसह तीन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. बीड हत्या प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर आलं आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या दोन्ही साथीदारांसह 11 डिसेंबरला भिवंडीत मित्राकडे राहण्यासाठी आला होता. मात्र येथे त्याला आसरा न मिळाल्याने तो तिथूनही पळून गेला असल्याची माहिती समोर येत आहे.
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिन्ही आरोपी 11 डिसेंबर रोजी भिवंडीत आले होते. तिथील एका समाजसेवकाच्या कार्यालयात आले होते परंतु तिथेदेखील त्यांना थांबण्यास नकार देण्यात आल्यानंतर ते तिथून निघाले आणि भिवंडीतील वळगाव येथील एका बिअर शॉपमध्ये गेले. या बिअर शॉपमध्ये सुदर्शन घुले यांच्या गावातील रवी बारगजे नावाचा व्यक्ती काम करत होता.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी जागा मिळावी म्हणून सुदर्शन घुले व त्याचे साथीदार भिवंडीत आले होते. त्यांनी या आधी एका सामाजिक कार्यकर्त्य यांचे कार्यालय गाठले परंतु ते न मिळाल्याने तेथून त्यांनी बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांचा पत्ता मिळवला व त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वैष्णोदेवी येथे ८ डिसेंबरलाच फिरण्यास गेले असल्याने संपर्क झाला नाही.
विक्रम डोईफोडे यांच्याशी संपर्क न झाल्याने ते स्वरीत बिअर शॉप व हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार एंड रेस्टॉरंट येथे पोहोचले. याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांनी विक्रम डोईफोडे यांना दिली. तेन्हा त्यांनी आरोपींना तिथे थांबण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा सुदर्शन घुले व त्याचे साथीदार थोड्या वेळात येतो असे सांगून निघाले तर पुन्हा परत आलेच नाही. या प्रकरणी बीड येथील सीआयडी व पोलिस तपास यंत्रणा या दोघांकडे चौकशी साठी येऊन गेले आहेत.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांवर होत असलेल्या आरोप आणि पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा उंचावता यावी यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. बीडमध्ये चार बदल्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामध्ये संतोष देशमुख यांना ज्या दिवशी मारहाण झाली त्यावेळी जे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ज्या पोलीस स्टेशनचे अधिकारी होते त्यांची बदली आता बीड येथील नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.