यादों की बारात.... आठवणी पंचमदांच्या!

राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन... बॉलिवूड संगीतचा एक असा सूर ज्याने या संगीताला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं... तब्बल 300 हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. आर. डी. यांची म्युझिक स्टाईल ही त्यांची जमेची बाजू... संगीतात इतके वैविध्यपूर्ण प्रयोग करणारा संगीतकार शोधून सापडणार नाही. आज आरडींची आठवण यायचं कारण म्हणजे आज आर. डी. बर्मन यांची आज 75 वी जयंती आहे.

Updated: Jun 27, 2014, 10:29 AM IST
यादों की बारात.... आठवणी पंचमदांच्या! title=
आर डी बर्मन आणि त्यांची पत्नी आशा भोसले

मुंबई : राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन... बॉलिवूड संगीतचा एक असा सूर ज्याने या संगीताला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवलं... तब्बल 300 हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. आर. डी. यांची म्युझिक स्टाईल ही त्यांची जमेची बाजू... संगीतात इतके वैविध्यपूर्ण प्रयोग करणारा संगीतकार शोधून सापडणार नाही. आज आरडींची आठवण यायचं कारण म्हणजे आज आर. डी. बर्मन यांची आज 75 वी जयंती आहे.

प्रसिद्ध संगीतकार एस.डी.बर्मन यांचा मुलगा म्हणजेच आर. डी. बर्मन... घरातूनच संगीताचं बाळकडू पंचमदांना मिळालं. उस्ताद अली अकबर खान यांच्याकडून सरोद आणि समता प्रसाद यांच्याकडून तबल्याचं प्रशिक्षण आर.डी.बर्मननी घेतलं. घरात असलेलं संगीत आर.डीं.ना स्वस्थ बसून देत नव्हतं. सुरुवातीच्या काळात पंचमदांनी आपले वडील एस.डी. बर्मन यांना असिस्ट केलं. (चलती का नाम गाडी, कोरा कागज था ये मन मेरा...) 

संगीतकार म्हणून खऱ्या अर्थाने पंचमदांनी करिअरला सुरुवात केली ती मेहमूद यांच्या छोटे नवाब सिनेमातून... तिसरी मंजील या सिनेमाच्या संगीताने आर.डी. बर्मनांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. या सिनेमातली सगळीच गाणी हीट झाली. त्यानंतर मात्र, आर.डी. बर्मन यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बहारों के सपने, प्यार का मौसम, कटी पतंग, अमर प्रेम,  हरे राम हरे कृष्ण, शोले, आंधी, यादों की बारात, बुढ्ढा मिल गया, अशा तब्बल 300 हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. दिवसागणिक पंचमदांची ही जादू वाढतंच गेली.

इतका प्रसिद्ध संगीतकार असूनही पंचम दांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअरचं पहिलं अवॉर्ड मिळालं ते 'सनम तेरी कसम' या सिनेमासाठी. आर. डी. यांनी अनेक नवोदीत गायकांना गाण्याची संधी दिली. तरीही त्यांची खरी गट्टी जमली ती आशा भोसले आणि गुलजार यांच्यासोबत...

शास्त्रीय संगीत असो... (रैना बिती जाए) किंवा कॅब्रे... (पिया तू अब तो आजा...) संगीताच्या दुनियेत आर.डी. मुक्तपणे बागडले. एखाद्या गाण्याला चाल लावताना जेवढे प्रयोग आर. डी. बर्मन यांनी केले असतील तेवढे क्वचितच दुसऱ्या संगीतकाराने केले असावेत.

संगीत म्हणजे आर.डी.साठी आत्मा होता. संगीत म्हणजेच आर.डी आणि आर.डी. म्हणजेच संगीत... मात्र, प्रत्येकाच्या आयुष्य़ात चढउतार येताताच. पंचमदांनाही ते चुकले नाही...

काळ बदलला, तसा पंचमदांच्या सुरांची, संगीताची मोहिनी कमी व्हायला लागली. सुरांच्या या बेताज बादशहाची जादू नाहिशी होण्याच्या मार्गावर होती.. मात्र, हार मानेल तर तो आर.डी. कसला, फिनीक्स पक्षाप्रमाणे आर.डी.यांनी झेप घेतली आणि मग समोर आलं ते 1942-अ लव्ह स्टोरी या सिनेमाचं संगीत...

मात्र, हा सिनेमा पंचमदांच्या मृत्यूनंतर रिलीज झाला.. आणि पुन्हा एकदा आर.डीं.च्या या संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली... महत्वाचं म्हणजे, आर.डीं.ची ही जादू आजच्या पिढीवरही कायम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.