मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, नेहा महाजन अशी मल्टीस्टारकास्ट असलेला वन वे तिकीट हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमोल शेट्गे दिग्दर्शित हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे.
पिंपरी चिंवडमध्ये राहणारा अनिकेत, जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता शशांक केतकर यानं. आपली परिस्थिती नसताना, एक स्वप्न उराशी बाळगून इटलीला जायचा निर्णय घेतो. तिथेच दुसरीकडे शिवानी जी भुमिका साकारलीये अमृता खानविलकरनं ती आदित्या राणेच्या प्रेमात पडते. आदित्य तिला इटलीत लग्न करु असं वचन देतो आणि काही कारणास्तव तिथे पोचतच नाही. पुढे क्रुझवर अनिकेत आणि शिवानीची भेट होते. यानंतर काय घडतं हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल. अभिनेता सचित पाटील आणि नेहा महाजन या दोघांच्याही यात महत्वाच्या भुमिका आहेत.
दिग्दर्शक अमोल शेटगे यांनीच सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लिहलेत. खरंतर सिनेमाची गोष्ट, लोकेशन, कास्ट सगळे फ्रेश वाटतं. मात्र त्या कथेची मांडणी करताना दिग्दर्शक फसलाय. त्यात अधून मधून सिनेमाची गरज नसतानाही गाणी का टाकतात या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत मिळत नाही. अभिनेता गश्मीर महाजनी असो शशांक केतकर असो किंवा सचित पाटील या तिघांच्याही वाट्याला चांगल्या व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्याचं एक्झिक्यूशन मात्र फसलंय.
सिनेमाला संगीत दिलंय संगीतकार गौरव डगावकर यांनी. सिनेमाचं संगीत चांगलं झालंय. विशेष करुन रेशमी रेशमी आणि बेफिकर हे दोन्ही गाणी छान वाटतात. वन वे तिकीट हा एक लाविष सिनेमा आहे. सिनेमाच्या रिच लोकेशन्स आणि फ्रेश कास्टमुळे सिनेमाची व्हॅल्यू वाढते.
वन वे तिकीट या सिनेमाला मिळतायत २.५ स्टार्स.