झाशीच्या राणीच्या भूमिकेसाठी सज्ज होतेय 'क्वीन'

पाण्यात राहून माशाशी वैर घेता येत नाही म्हणतात पण कंगना रानौत याला अपवाद आहे. बॉलिवूडमध्ये राहून वर्षानूवर्षे प्रस्थापित लोकांशी वैर घेऊनही या 'क्वीन'नं आपली दबंगगिरी कायम ठेवली आहे. अर्थात याला वैर नाही म्हणता येणार... आपल्यावर होणारे वार ती तेवढ्याच ताकदीने परतवून लावतेय इतकंच...

Updated: May 18, 2017, 09:51 PM IST
झाशीच्या राणीच्या भूमिकेसाठी सज्ज होतेय 'क्वीन' title=

मुंबई : पाण्यात राहून माशाशी वैर घेता येत नाही म्हणतात पण कंगना रानौत याला अपवाद आहे. बॉलिवूडमध्ये राहून वर्षानूवर्षे प्रस्थापित लोकांशी वैर घेऊनही या 'क्वीन'नं आपली दबंगगिरी कायम ठेवली आहे. अर्थात याला वैर नाही म्हणता येणार... आपल्यावर होणारे वार ती तेवढ्याच ताकदीने परतवून लावतेय इतकंच...

हिमाचलच्या भंबला या छोट्याशा गावातून आलेली बंडखोर पहाडी मुलगी पुन्हा एकदा लढायला सज्ज झालीय... अर्थात हे युद्ध कुणा व्यक्ती विरोधात नाही तर हे युद्ध आहे रणांगणावरचं... झाशीच्या राणीचं... मनकर्णिका चित्रपटातून ती लवकरच आपल्या भेटीला येतेय... डंका वाजलाय तो थेट देवभूमी वाराणसीतून!

गंगेला साद

मनकर्णिकामधल्या मनूच्या अर्थात झाशीच्या राणीच्या भूमिकेसाठी कंगनाची तयारी सुरु झालीय. चित्रपटाच्या शुटिंगसाठी वाराणसीत गेल्यानंतर तिनं सगळ्यात आधी गंगेला साद घातली... गंगास्नान आणि गंगाघाटावरची आरती करताना ठसठशीत कुंकू, नऊवारी साडी आणि चेहऱ्यावरचे कणखर भाव... या लूकमुळे कंगना झाशीच्या राणीची भूमिका करायला सज्ज झाल्याचं दिसलं... वाराणसीत बोलताना कंगना म्हणाली, आजपर्यंत झाशीच्या राणीवर चित्रपट येऊ नये याचंच आश्चर्य वाटलं, पण बरं झालं, ती भूमिका माझ्याच नशिबी आहे... या संधीचं सोनं करण्यासाठी कंगना जीव तोडून मेहनत घेतेय. त्यासाठी ती तलवारबाजी आणि घोडसवारीही शिकतेय...

ती आली... तिनं पाहिलं... आणि जिंकलंही!

कंगनांचं बूॉलिवूडमधलं करिअर जेमतेम ११ वर्षांचं... पदार्पणातल्या गँगस्टरमधल्या भूमिकेतून ती चर्चेत आली. पदार्पणातल्या तिच्या अभिनयासाठी तिला थेट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर कंगनानं मागे वळून पाहिलंच नाही.

फॅशन, तनू वेडस मनू आणि क्वीनसाठी कंगनानं आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्या भूमिकाही तिने तेवढ्य़ाच ताकदीने साकारल्या होत्या .. याच तीन सिनेमांसह गँगस्टरमधल्या उत्कृष्ट पदार्पणासाठी तिनं आतापर्यंत चार फिल्मफेअर स्वतःच्या नावावर केलेत. आता कंगना लेखन आणि दिग्दर्शनाकडेही वळतेय....


गंगेला साद

वाद आणि कंगना

एकीकडे यशाच्या पाय-या चढता चढता दुसरीकडे कंगना वादग्रस्तही ठरत होती.... आदित्य पांचोलीसोबतची तिची लिव्ह इन रिलेशनशिप, अध्ययन सुमनशी जवळीक याच्या खमंग चर्चा रंगल्या, हृतिक रोशनला एक्स बॉयफ्रेंड म्हंटल्यानंतर दोघांमधलं युद्ध तर थेट कोर्टात जाऊन पोहोचलं. बॉलिवूडमधलं नेपोटिझम अर्थात वशिलेबाजीवर तिनं परखड भाष्य केलं... इतकंच नाही तर करण जोहरच्या शो म्ध्ये जाऊन त्यालाच ती नेपोटिझमवरुन चार शब्दही सुनवून आली.   फेअरनेस क्रीमची जाहिरातही कंगनानं नाकारली....

'मेरी झाँसी नहीं दुंगी'

कंगनाचा हाच स्पष्टवक्तेपणा तिच्या अभिनयातूनही दिसतो... सतत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी आग्रही राहिलेली कंगना आता मनकर्णिकेच्या रुपातून समोर येणार आहे. कंगना कणखर आणि लढवय्यी तर आहेच... आता 'मेरी झाँसी नहीं दुंगी' म्हणणारी तिच्या रुपातली मनकर्णिका कशी असेल, याची उत्सुकता आहे.