मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दुबईमध्ये भेटलो असल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे. 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या पुस्तकामध्ये ऋषी कपूर यांनी दाऊदबरोबर झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
1988 मध्ये दुबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असताना ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल चार तास चर्चा झाली होती. दाऊदच्या कुटुंबातील काही जणांसोबत माझी अनेकदा भेट झाली. तसेच 'श्रीमान आशिक' या माझ्या सिनेमातील गाणी दाऊदचा भाऊ नूरा याने लिहिली असल्याचेही ऋषी कपूर यांनी पुस्तकात सांगितलये.
प्रसिद्धीमुळे आयुष्यात चांगल्या लोकांसोबतच काही संशयास्पद लोकांनाही मी भेटलो. यापैकी एक होता दाऊद इब्राहिम. 1988 साली मी माझा जवळचा मित्र बिट्टू आनंदसोबत आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला गेलो होतो. मी तेथून जात असताना एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला. माझ्याकडे फोन देऊन 'दाऊदसाहब बात करेंगे' असं तो म्हणाला.
1993 स्फोटांच्या पूर्वीची ही घटना असल्याने त्यावेळी तो महाराष्ट्रातील लोकांचा शत्रू नव्हता. मला तरी असं वाटायचं. दाऊदने माझं स्वागत केलं आणि मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. दाऊदच्या घरी गेल्यावर दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन ड्रेसमध्ये आला आणि उत्साहात त्याने आमचं स्वागत केलं.
मी दारू पित नसल्याने तुम्हाला चहा पिण्यासाठी बोलावलं असं तो म्हणाला. त्यानंतर जवळपास 4 तास आमचं चहा-बिस्किटचं सत्र सुरू होतं. त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. स्वतः केलेले अपराधही त्याने सांगितले. मात्र त्यासाठी त्याला कोणताही पश्चाताप वाटत नव्हता.
भारतात मला न्याय मिळणार नाही म्हणून मी भारतातून पळालो. भारतात अनेक लोक माझ्या विरोधात आहेत, असं त्याने मला सांगितलं. यानंतर कृपया या सर्वांपासून मला दूर ठेव. मी एक अभिनेता आहे, मला यामध्ये पडायचं नाही असं मी त्याला सांगितलं. त्यानंतर कधी पुन्हा दाऊद मला भेटला नाही.