मुंबई : सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटका होऊ शकते.
२०१३ पासून तुरुंगात असलेल्या संजय दत्तला चांगल्या वागणुकीचं बक्षीस म्हणून शिक्षा कपातीचं बक्षीस मिळून तो लवकर बाहेर येण्याची चिन्ह आहेत. गृहराज्यमंत्र्यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्याचीही सूत्रांकडून माहिती मिळतेय.
कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेनुसार, संजय दत्त ऑक्टोबर महिन्यात सुटणार आहे. परंतु, नियमांनुसार कोणत्याही कैद्याला ११४ दिवसांपूर्वीच काही अटींच्या पूर्ततेच्या अटीवर शिक्षेत सूट मिळू शकते.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी संजय दत्त दोषी ठरला होता. त्यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनावणीनंतर २०१३ मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगतोय.
तुरुंगातील चांगल्या वर्तवणुकीच्या कारणास्तव येरवडा तुरुंग प्रशासनानं त्याच्या सुटकेसाठी प्रस्ताव दिला होता. त्याला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मिळतेय.
कोर्टानं संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. यातील त्यानं १८ महिने अगोदरच तुरुंगात काढले होते. त्यामुळे, केवळ साडे तीन वर्षांची शिक्षा त्याला भोगायची होती. संजय दत्तनं जवळपास २ वर्ष ९ महिन्यांची शिक्षा पूर्ण केलीय. या दरम्यान तो अनेकदा फर्लोवर सुट्टी मिळवून बाहेरही आला होता. तसंच त्यानं फर्लोच्या कायद्याचं उल्लंघनही केलं होतं.