मुंबई : "झी मराठी" या वाहिनीवरील चर्चेतील कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' यामधील थुकरटवाडीत राजकीय वारे वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे एकाच व्यासपीठावर आलेत.
आपल्या राजकीय नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने जनमाणसांवर आपली छाप सोडणारे आणि राज्यातच नाही तर देशभरात वेगळी ओळख निर्माण केलेले नेते म्हणजे राणे, आठवले आणि सरदेसाई. तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे हे नेते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहतात. असे हे तीन दिग्गज नेते प्रथमच एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत.
झी मराठीवरील लोकप्रिय असलेला आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात हे नेते सहभागी होणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा झी मराठीवरुन हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत.
प्रेक्षकांना भरभरून हसविणारा आणि काही वेळा डोळ्यांच्या कडाही ओला करणारा कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. थुकरटवाडी गावातील अतरंगी पात्र या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटतात आणि त्यांचं मनोरंजन करत निखळ आनंद देतात. याच थुकरटवाडीत येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणाऱ्या भागात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई या राजकीय नेत्यांचे काही नवे पैलू 'चला हवा येऊ द्या' मधून बघायला मिळणार आहेत.
आणि राणे झालेत भावूक...
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते म्हणजे नारायण राणे. कोकणभूमीचे सुपुत्र असलेले राणे राज्यात ओळखले जातात ते त्यांच्या बेधडक वक्तव्य आणि निडर वृत्तीमुळे. मुख्यमंत्री असताना अनेक लोककल्याणाचे आणि विकासाचे निर्णय त्यांनी असेच बेधडकपणे घेतले. त्यांच्या याच कार्याच्या आठवणी जाग्या करणारं एक (काल्पनिक) पत्र या भागात ऐकायला मिळणार आहे जे लिहिलंय मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यांनं. थुकरटवाडीतील पोस्टमन काका हे पत्र वाचत असताना स्वतः राणेही भावूक झाले होते. यावेळी रंगलेल्या गप्पांमधून राणे यांनी राजकीय जीवनातील संघर्षाच्या आठवणीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगितल्या.
कवी रामदास आठवले
कार्यक्रमात धम्माल आणली ती रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता आणि अभिनयाने. खुमासदार राजकीय वक्तव्यांसोबतच आपल्या खुसखुशीत आणि उत्स्फुर्त राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी शोलेतील गब्बरच्या भूमिकेचं एक प्रहसन रंगवलं शिवाय काही कविताही सादर केल्या.
आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव
मीच जिंकणार आहे आजचा डाव
आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव
कारण आठवले आहे माझं नाव
अशी कविता आठवले यांनी सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
भैय्या निघाले मामाच्या गावाला...
मराठी अस्मितेचा लढा पुकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासाठी थुकरटवाडीच्या बॅंडने 'पळते भैय्ये पाहूया मामाच्या गावाला जाऊया' हे गाणं सादर करत धम्माल उडवून दिली. याशिवाय अनेक गमती जमती या कार्यक्रमात घडल्या आहेत. येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा. 'चला हवा येऊ द्या' चे हे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.