बॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ

सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे. 

Updated: Dec 28, 2015, 04:26 PM IST
बॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ title=

मुंबई : सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे. दोन्ही चित्रपटांनी दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवलाय. दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिलवाले या चित्रपटाने १२३.८८ कोटींची कमाई केली तर बाजीराव मस्तानीने जोरदार टक्कर देताना तब्बल १२०.४५ कोटी कमावलेत.

प्रदर्शनाच्या सुरुवातीला शाहरुख-काजोलची जोडगोळी असलेल्या दिलवाले या चित्रपटाने जबरदस्त कमाईचे इमले रचले होते. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने सुस्साट वेग धरला खरा मात्र हा वेग कायम राखण्यात दिलवालेला अपयश आले. सुरुवातीला संथ सुरुवात करणाऱ्या बाजीराव मस्तानीने मात्र आता कमाईत चांगलाच वेग घेतलाय. 

दिलवालेपेक्षा चित्रपट समीक्षकांनी बाजीराव मस्तानीला अधिक पसंती दर्शविल्याने प्रेक्षकांचा ओढा बाजीरावकडे जास्त वाढू लागलाय. त्याचा परिणाम दुसऱ्या वीकेंडच्या कमाईवर दिसून आला. दुसऱ्या वीकेंडमध्ये दिलवालेने २१.२३ कोटी कमावले तर बाजीरावने तब्बल ३४.३० कोटींची कमाई केली. 

दिलवालेला देशासोबतच परदेशातही चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने जगभरात मिळून तब्बल २७३.७५ कोटी कमावलेत.