'पीकू' रिव्ह्यू : अमिताभ, दीपिका आणि इरफानच्या प्रेमात पडाल...

Updated: May 8, 2015, 06:17 PM IST
'पीकू' रिव्ह्यू : अमिताभ, दीपिका आणि इरफानच्या प्रेमात पडाल...   title=

 

सिनेमा : पीकू
दिग्दर्शक : सुजीत सरकार
कलाकार : दीपिका पादूकोण, अमिताभ बच्चन, इरफान खान
संगीत : अनुपम रॉय 
वेळ : १३५ मिनिटे

मुंबई : सुजीत सरकार दिग्दर्शित चा 'पिकू' हा सिनेमा या वर्षांतील सर्वांत सुंदर हिंदी सिनेमा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको... या चित्रपटाची पटकथा जुही चतुर्वेदी आणि दिग्दर्शन सुजित सरकारने केलं आहे. सिनेमातील पात्र, त्यांच्या भावना, एकमेकांविषयी प्रेम या गोष्टी ह्रदयाला स्पर्श करून जातात. यासाठी या दोघांच्या हिंमतीचं कौतुक करावं तेवढं कमीच... 

कथानक : 
ही गोष्ट आहे पीकूची (दीपिका पादूकोण) आहे. जी आपले वडील भास्कोर बॅनर्जी (जे स्वत:ला भास्कर नाही भास्कोर बोलणं पसंत करतात) यांच्यासोबत दिल्लीच्या चितरंजन पार्कमध्ये राहत असते. एका कंपनीत ती नोकरी करते. मात्र, तिचं संपूर्ण जगचं वडिलांच्या अवतीभोवती फिरतंय. कारण त्यांना फक्त बद्धकोष्ठतेचा आजार नाही तर ते प्रत्येक क्षणी त्याबाबत विचार करत असतात. 

सकाळी नाश्ता असो वा रात्रीचं जेवण, विषय नेहमी पोट, बद्धकोष्ठ हेच असतं. आजारातून बरं झाल्यानंतर भास्कोर बॅनर्जींना आपल्या मूळगावी कोलकाताला जाययचंय... तेही रस्त्याच्या मार्गाने... हिमाचल टॅक्सी सर्विसचा मालक राणा चौधरी (इरफान खान) त्यांना घेऊन जातो. त्यानंतर सुरू होतो दिल्ली ते कोलकात्याचा मनोरंजक प्रवास...

भाव-भावनांची सरमिसळ...
ऋषिकेश मुखर्जींच्या सिनेमांप्रमाणे हा सिनेमा वरवर साधा-सरळ वाटतो, मात्र त्यात मानवी भावनांचे अनेक पैलू आहेत. एकानंतर एक या गोष्टी स्पष्ट होत जातात. लेखिका जुही चतुर्वेदी आणि शुजीत सरकारने बंगाली कुटुंबाचा सेटअप आणि कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या रुपात भास्कोर बॅनर्जी उभी केलेली ही व्यक्तीरेखा विलक्षण आहे.

अमिताभ बच्चन 'अॅज ऑलवेज...' 
अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबद्दल काय बोलायचे, त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. मोशन न होण्याची अस्वस्थता असो, इरफानसोबतचे वादविवाद असो वा सायकलवर कोलकाता फिरतानाचे त्यांचे सीन असो... अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक सीनमध्ये आपली छाप सो़डली आहे. 

दीपिका आणि इरफान
मुख्य भूमिकेत दीपिकाने जी परिपक्वता दाखवली आहे, त्यातून नवीन आशा जागृत होते. म्हणूनच दीपिकाला बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री म्हटलं जाऊ लागलंय. इरफान आपली भूमिका इतक्या सहजतेने निभावतो की वाटतच नाही तो अभिनय करत आहे. छोट्याशा भूमिकेत मोसमी चॅटर्जी खूप छान वाटत आहेत. पीकू सिनेमा जास्त नाटकीय नाही. 

चित्रपट पाहण्यास कारण की... 
साधेपणा हेच चित्रपटाचं वैशिष्ट आहे. चित्रपटाचे संवाद आणि तिन्ही मुख्य व्यक्तीरेखांचे अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं संगीतही श्रवणीय आहे. सुजीत सरकारने उत्कृष्ट सिनेमा बनवला आहे. हा सिनेमा न बघण्याचं कोणतंही कारण नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.