www.24taas.com, मुंबई
२६ / ११चा दहशतवादी कसाबला आज सकाळी साडे सातच्या सुमारास फाशी देण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला. त्याबाबतची फाइल ७ तारखेला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पोहोचली, त्यांनी योग्य ती कारवाई करून ती ८ नोव्हेंबरला ती महाराष्ट्र सरकारला पाठवली.
दरम्यान, कसाबच्या फाशीची तारीख सत्र न्यायालयाने ११ सप्टेंबर रोजीच ठरवली होती. त्या दिवशी दिलेल्या निकालात त्यांनी २१ नोव्हेंबरला फाशीचा दिवस निश्चित केला होता.
फाशी देण्यासंबंधीचे नियम
- राज्य सरकारने फाशीचा दिवस निश्चित केल्यानंतर, तुरुंग अधीक्षक त्याबाबत कैद्याच्या नातेवाईकांना कळवतात.
- कैद्याच्या नातेवाईकांना अथवा अन्य कैद्याच्या नातेवाईकांना फाशीवेळी उपस्थित राहता येत नाही. मात्र, समाजशास्त्रज्ञ , मानसशास्त्रज्ञ यांना तिथे उपस्थित राहायची इच्छा असल्यास कारागृह अधीक्षक तशी मुभा देऊ शकतात.
- तुरुंगाची सुरक्षाव्यवस्था आणि नियम लक्षात घेऊन कैद्याला त्याच्या श्रद्धास्थानाची प्रार्थना करण्याची संधी दिली जाते.
- फाशी देताना तुरुंगातील सर्व वर्गांतील अन्य कैद्यांना सारी प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांच्या कोठडीत बंदिस्त ठेवले जाते
- फाशी देण्यापूर्वी गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते
- सूर्योदयाच्या सुमारास त्याला फाशी दिली जाते.
- फाशीच्या दिवशी त्या ठिकाणी तुरुंगाचे अधीक्षक, उपअधीक्षक, सहा. अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात.
- जिल्हा दंडाधिका-याने नेमलेले कार्यकारी दंडाधिकारी फाशी देताना उपस्थित राहून वॉरंटवर स्वाक्षरी करतात.
- फाशीच्या आदल्या रात्री त्या कैद्याला त्याच्या आवडीचे अन्नपदार्थ दिले जातात. दुस-या दिवशी फाशी देण्याच्या दोन तास आधी कैद्याला उठवून स्नान करावयास सांगितले जाते. नवे कपडे दिले जातात.
- कोठडीतून बाहेर काढताना चेहरा बुरख्याने झाकून दोन्ही हात मागे बांधले जातात. कोणत्याही परिस्थितीत त्याने फाशी देण्याची तयारी पाहू नये, याची दक्षता घेतली जाते.
- फाशी दिल्यानंतर मृत शरीर अर्धा तास तसेच ठेवले जाते आणि वैद्यकीय अधिकार्यााने तो मृत झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच ते खाली उतरवले जाते.
- कैद्याच्या धर्माच्या परंपरेनुसार कैद्यावर अंत्यसंस्कार केले जातात .
- कैद्याच्या नातेवाईकांनी लेखी विनंती अर्ज केला , तरच मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला जातो. मात्र अंत्यसंस्कार जाहीररीत्या न करण्याचे बंधन त्यांच्यावर घातले जाते .