मुंबई : २००९ साली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा झेंडा हाती घेत बाळा नांदगावकर शिवडी मतदार संघातून विधानसभेत दाखल झाले. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेनं सपाटून मार खाल्ल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत नांदगावकरांना आपलं डिपॉझिटही गमवावं लागलंय. त्यामुळे ‘मनसे’चा हा गड राखणं आता बाळा नांदगावकरांसमोर एक आव्हानचं आहे.
सुरुवातीला आपणहूनच यंदाची निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते... त्यानंतर मनसेच्या दोन याद्या जाहीर झाल्या या दोन्ही याद्यांमध्ये बाळा नांदगावकर यांचं नाव नव्हतं... पण, यानंतर मात्र मनसेनं नांदगावकरांचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलं. त्यामुळे आता ‘आपला हक्काचा माणूस’ म्हणून बाळा नांदगावकर आपला जोर आजमावत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेनं अजय चौधरी, भाजपनं शलाका साळवी, काँग्रेसनं मनोज जामसूटकर तर राष्ट्रवादीनं नंदकुमार काटकर यांना रणांगणात उतरवलंय.
२००९ साली शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नं पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविली... यावेळी, त्यांनी तब्बल १४३ उमेदवार उभे केले होते... त्यापैंकी १३ उमेदवारांनी विजयश्री प्राप्त केला. या मनसेच्या १३ शिलेदारांपैकीच एक होते... बाळा नांदगावकर
भुजबळांना दिली मात...
एकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर बाळासाहेब ठाकरे पेचात सापडले होते. भुजबळांनी आपल्या सहकार्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढच्या विधानसभेत त्यांना माझगाव विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळालं. त्यानंतर, भुजबळांना मात देण्यासाठी बाळासाहेबांनी बाळा नांदगावकर या नवख्या तरुणाला मैदानात उतरवलं... शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या भुजबळांना नांदगावकरांनी या निवडणुकीत धोबीपछाड दिली. त्यानंतर त्यांना ‘जाएंट किलर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'...
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर शिवसेनेच्या तिकिटावर काळाचौकी मतदारसंघातून विजयी झाले... पण, राज ठाकरे यांनी शिवसेनेला ' जय महाराष्ट्र ' केला तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून नांदगावकर राज ठाकरेंसोबतच दिसत होते. पण, यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा मात्र राजीनामा दिला नव्हता. विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता, सेनेनंही त्यांच्यावर कारवाई केली नव्हती... यानंतरही शिवसेनेचे आमदार म्हणूनच ते प्रत्येक अधिवेशनाला हजर राहताना दिसले...
पण, २००९ मध्ये आपल्या शिवसेना आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. मतदारसंघ पुनर्रचनेत माझगाव विधानसभा शिवडीशी जोडली गेली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजीनामा देताना 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिलंय... अत्यंत जड अंतःकरणानं मी हा राजीनामा देतोय... पण, मी बाळासाहेबांचा कायम ऋणी राहीन...' असं म्हणताना त्यांना आपले अश्रू आवरणं कठिण झालं होतं.
२००९च्या विधानसभा रणसंग्रामात दगडू सकपाळांसारख्या मातब्बर उमेदवाराला पराभवाचा झटका नांदगावकर यांनी दिला. बाळा नांदगावकर यांनी ६ हजार ४६३ मतांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. नांदगावकरांना ६४ हजार ३५४ मते मिळाली, तर दगडू सकपाळ यांनी ५७ हजार ८९५ मते घेतली. काँग्रेस उमेदवार स्मिता चौधरी यांच्या वाट्याला अवघी १५ हजार ४३१ मते आली. यानंतर बाळा नांदगावकर यांची विधान सभेत मनसे गटनेते म्हणून नियुक्ती झाली होती... त्यामुळे आता यंदाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.