ब्रेक अप के बाद... बंड्या जोमात सर्व कोमात..

तुमचा मित्र बंडोजीराव अर्थात सर्वच बंड्या म्हणतात, तर हा तुमच्या बंड्या तुमच्या भेटीला पुन्हा आला आहे. मी बंडोजीराव तसा सध्या शहरी भागाच्या दौऱ्यावर असल्याने तसा शहरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

Updated: Oct 4, 2014, 03:30 PM IST
ब्रेक अप के बाद... बंड्या जोमात सर्व कोमात.. title=

नमस्कार मित्रांनो,

तुमचा मित्र बंडोजीराव अर्थात सर्वच बंड्या म्हणतात, तर हा तुमच्या बंड्या तुमच्या भेटीला पुन्हा आला आहे. मी बंडोजीराव तसा सध्या शहरी भागाच्या दौऱ्यावर असल्याने तसा शहरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

'यू नो' मी बंडोजीराव आहे, मला थोडं 'टेन्शन' येतं शहरात आल्यावर, तसं हे शहरी मराठीत बोलणं मला 'परवडेबल' नाही, पण मी माझ्या लेव्हलला ट्राय करणार आहे. सो इट्स ओके ना!.

काय राव मी अख्या मुंबईत फिरतोय, सर्व शिवसेनेच्या शाखेत लगबग दिसतेय, तसं शिवसेनेच्या एकेकाळच्या मित्र पक्षाकडे दिसून येत नाही. मला प्रश्न पडलाय, पण विचार करा पंचवीस वर्षांची युती तुटली, ब्रेकअप झालं, मुंबईत पंचवीस वर्षापासून शिवसेनेची जी कार्यालय आहेत ती आहेतच. तसा नवा संसार थाटायला वेळ जाणारच.

वेगळं होण्याचं दु:ख काय असतं, हे दोन्ही पक्षांनाच चांगलं माहित असावं, भांड्याला भांड लागलं, आणि वाद चव्हाट्यावर, घरातलं सामान थेट रस्त्यावर... त्यात दोन्ही लोकांसमोर हा निवडणुकीचा मोठा सण आलाय, तसा तो पाच वर्षातून एकदाच येतो.

आता घरात काय काय होत होतं सर्व बाहेर येणार, कोण कामं करत होतं, कोण भांडी घासत होतं, कोण भांडी पुसत होतं, कोण चोरून लोणी खातं होतं, कोण डोळे मिटून दूध पित होतं, सर्व बाहेर येणार, कोण हवश्या, कोण नवश्या आणि कोण गवश्या हे सर्व गुण बाहेर आहे. हे नुसतं युतीचंच नाही बरं का, आघाडीतही चाललंय हे.

जागावाटपाच्या वादावर आता काय माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनं काय बोलावं. सत्तासुंदरी यांच्यासाठी हातात माळ घेऊन बसली होती, आणि यांचं चाललं होतं तू नाही मी.

सत्तासुंदरी आता रूसली आहे की, आल्यापावलानं निघून गेलीय, ते १९ तारखेलाच कळणार, सत्ता सुंदरीचं टायमिंग चुकलं तर काय होतं, हे निदान अरविंद केजरीवालकडे बघून तरी ओळखून घ्यायला हवं होतं.

केजरीवालांचं असंच झालं, दिल्लीत सत्तासुंदरी घरात आणि हा धनी रस्त्यावर आंदोलनं करत फिरत होता, अधिकारांचा वापर सोडून, आणखी अधिकाराची मागणी, ताटातलं खायचं नाही, आणि सांगायचं हे पण द्या ते पण द्या, वेळ झाली पंगत उठली, आणि भरल्या ताटावरून केजरीवाल उठून गेले. आणि आता सत्तेची सपाटून भूक लागलीय, आता त्यांना सत्तेचं महत्व कळतंय म्हणे.

महाराष्ट्रातही तशीच स्थिती होणार नाही हे कशावरून? राजकारणात सर्वच शक्यतांना महत्व असतं. 

मुंबईत आज मोदींची सभा आहे, पाहतोय काय वातावरण आहे. येतो उद्या पुन्हा भेटायला.... तुमचा बंडोजीराव (बंड्या)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.