असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!

निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली. 

Updated: Sep 29, 2014, 07:59 PM IST
असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!  title=

चंद्रपूर: निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली. 

चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातले सुदर्शन निमकर.. तिकीटासाठी त्यांनी चांगलीच चपळाई केली. निवडून आले काँग्रेसच्या तिकीटावर. पण यावेळी उमेदवारी नाकारल्यानं गेले राष्ट्रवादीत. आघाडी असताना राजुरा होतं काँग्रेसच्या वाट्याला. अगदी काल परवापर्यंत आग्रह धरूनही राजुरा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत नाही म्हटल्यावर निमकरांनी शिवसेनेशी संधान साधलं. गुरूवारी रितसर शिवबंधनही हाताला बांधून घेतलं. 

मात्र काही तासांत आघाडी तुटली आणि राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं निमकर शिवबंधन तोडत राष्ट्रवादीत परतले. अवघ्या चार तासांत त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेना आणि परत राष्ट्रवादी असा प्रवास केला. निमकरांची ही चपळाई त्यांच्या विरोधकांनाही थक्क करून गेली.

आघाडी आणि महायुतीचा काडीमोड झाल्यामुळं राज्यात गेली दोन दिवस उमेदवारांचा अक्षरश: पोळा फुटला होता, मिळेल तिथून उमेदवार आणि उमेदवारी मिळवायची हा एकच चंग सर्वांनी बांधला होता. सर्वच पक्ष AB form दारात घेऊन उभे होते. कसली निष्ठा अन कसल्या शपथा. राजकीय बाजाराचा सर्वोत्तम नमुना उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला त्यात कडी केली ती राजुरा क्षेत्रानं हे नक्की!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.