बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.
पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर प्रचार सभेचा प्रारंभ केला 'मी असेपर्यंत गोपीनाथ मुंडेंचं नाव विसरु देणार नाही, मी नेहमीच त्यांचा चेहरा राहिन', असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुंडेसाहेब गेल्यानंतर घरात बसून रडण्यापेक्षा मैदानात उतरुन लढण्याची मी शपथ घेतली. त्यामुळे माझ्या पित्याचं स्वप्न पूर्ण करणार आणि गोपीनाथ मुंडेंचं नाव मी जगाला विसरुन देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भगवानगडावरून गोपीनाथ मुंडे यांचं अखेरचं भाषण झाल्यानंतर प्रथमच पंकजा यांनी गडाची पायरी चढली. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पंकजा यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी एकनाथ खडसे, प्रीतम मुंडे आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते.
प्रचारसभेच्या सुरुवातीलाच गोपीनाथ मुंडे यांच्या अखेरच्या भाषणाची ध्वनीफित सुरू झाली आणि भगवानगडावरील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळलं. भगवान गडावरुन मला पंकजा दिसते, हे गोपीनाथ मुंडे यांचे शब्द ऐकताना खुद्द पंकजा मुंडे यांनाही गहिवरुन आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.