पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी!

‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

Updated: Oct 2, 2014, 04:45 PM IST
पंकजा.... गोपीनाथ मुंडेंची छबी! title=

मुंबई : ‘मी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा... त्यांची छबी’ असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यंदा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरतायत... महत्त्वाचं म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर बीड मतदार संघातून निवडणूक लढवून केंद्रात जाण्याची मिळणारी संधी बाजुला सारून पंकजा यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीद्वारे पंकजाची लहान बहिण प्रीतम मुंडे – खाडे आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करत आहेत.

२६ जुलै १९७९ रोजी जन्मलेल्या पंकजा पहिल्यांदा राजकारणात उतरल्या त्या २००९ साली... अनुभवी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली ती आपल्या जन्मगावातून... परळी मतदारसंघातून... आणि पहिल्याच धडाक्यात त्यांनी विजयश्री खेचूनही आणला. 

पती अमित पालवे यांचाही पाठिंबा त्यांना मिळाला. पंकजा-अमित या अपत्याला एक मुलगा आहे. पंकजा यांनी ‘बीएससी’पर्यंत शिक्षण पूर्ण केलंय.  

त्यानंतर, बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने वडिलांच्या प्रचारासाठी पंकजानं सभांचा धडाका लावलेला महाराष्ट्रानं पाहिला होता. स्त्री भ्रूणहत्येच्या प्रश्नावरही पंकजानं आवाज उठवला होता. यासाठी त्यांनी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ योजनाही सुरू केली. तर मराठवाड्यात स्त्री जन्माचं गुणोत्तर समप्रमाणात आणण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरु केली. विधानसभेतली त्यांची कामगिरी तशी समाधानकारकच राहिलीय.

लोकसभा निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश संपादीत केल्यानंतर, काही दिवसांतच म्हणजेच ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर आपल्या कुटुंबाला आणि मुंडे यांच्या भावनावेग झालेल्या कार्यकर्त्यांना आवरणाऱ्या पंकजा पाहिल्यावर अनेकांना पंकजा मुंडे यांच्यातला ‘नेता’ प्रखरतेने दिसला. इतकं कमी की काय भाजपच्या अनेक नेत्यांना पंकजामध्ये ‘महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री’ही दिसली. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांनीही पंकजा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता असल्याची कबुली जाहीरपणे दिली.

बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध केवळ राजकीय नव्हते तर वैयक्तिकही होते... असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या पंकजा यांच्याविरुद्ध उमेदवार उभा करण्यासही नकार दिलाय. पण, चुलत भाऊ धनंजय मुंडे हे मात्र पंकजा मुंडेंविरुद्ध दंड थोपटून राष्ट्रवादी पक्षाकडून उभे राहिलेत. याविषयी बोलताना, ‘मी परळी मतदारसंघातली सिटिंग आमदार आहे... त्यामुळे मी नाही तर धनंजय मुंडे माझ्याविरुद्ध लढण्यासाठी उभे राहिलेत’ असंही पंकजा मुंडे म्हणतायत. त्यामुळे, आता दुसऱ्या पिढीतला मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष यानिमित्तानं या मतदार संघात पाहायला मिळणार आहे.     

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.