'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?

रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

Updated: Oct 2, 2014, 02:09 PM IST
'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार? title=

मुंबई : रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी स्वत:ला बांधून घेतलेल्या आर. आर. पाटील यांची एक स्वच्छ चारित्र्याचा, शांत आणि सुस्वभावी नेता अशीच प्रतिमा जनमानसांत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) असलेल्या आबांनी उपमुख्यमंत्री पदही भूषवलंय. 

गली जिल्ह्याातला तासगाव हा आबांचा विधानसभा मतदारसंघ... आबांची या मतदारसंघावरची पकड त्यांच्या कारकिर्दीवरून लगेचच दिसून येईल. १९९० पासून सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 

आबांच्या राजकीय कारकीर्दिवर एक नजर... 
१६  ऑगस्ट  १९५७ साली महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात त्यांचा जन्म झाला. अंजनी हे त्यांचं जन्मगाव... शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या  शाळेत लहानपणी श्रमदान करून त्यांनी शिक्षण घेतलं....  पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं. 

सुरुवातीच्या राजकीय जीवनामध्ये १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम पाहिलेल्या आबांनी १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९ अशा सलग पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येण्याचा पराक्रम करून दाखवलाय.  

पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेत असताना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आबांचे थरथरणारे हात अनेकांनी पाहिले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवून देण्यासाठी ते तेव्हा पुरेसे होते. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री पदावर आरुढ झालेल्या आबांना २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांची 'छोटी छोटी' वक्तव्य त्यांच्या कामावर हावी ठरली होती... अगोदर राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या आबांना वरून आदेश देण्यात आल्यानंतर आपल्या बेजबाबदार वक्तव्यांची उपरती झाली आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.  

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर. आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

आबांच्या 'तासगाव' मतदारसंघाची वैशिष्टय...
* तासगाव आणि कवठेमहांकाळ हे दोन्ही तालुके राजकीय दृष्ट्या अधिक जागरूक आणि संवेदनशील म्हणून ओळखला जातो.

* तासगावचे नेते स्वर्गीय दिनकर आबा पाटील हे तीन वेळा तासगावचे  आमदार  म्हणून  निवडून आले होते. 

* स्वर्गीय दिनकर आबांनी तासगाव साखर  कारखान्याच्या  उभारणीसाठी माजी  मुख्यमंत्री  स्वर्गीय  वसंतदादांची  मदत  न  घेता राज्याचे तत्कालीन  मुख्यमंत्री  शंकरराव  चव्हाण  यांचे  सहकार्य  घेतले. 

* यामुळे  दादांच्या  जिल्ह्यातील  एकमुखी  नेतृत्वाला  आव्हान तासगावातून मिळाले. यातूनच तासगावच्या राजकीय पटलावर सांगलीच्या आशीर्वादाने आर आर आबांचा राजकीय उदय झाला.

* १९९० च्या निवडणुकीत आबांनी काँगेसच्या उमेदवारीवर विधानसभेत प्रवेश  केला. त्यावेळी  पासून  आर  आर  आबां  आणि दिनकर आबा पाटील  या  दोन गटात  संघर्ष  सुरु  झाला. 

* स्वर्गीय  दिनकर  आबांचे  पुतणे  आणि  नूतन  खासदार  संजय  काका  पाटील  यांनी  ही  तालुक्यात  आर आर पाटील यांच्याविरोधात परंपरागत विरोधक म्हणून आव्हान निर्माण करून ठेवलंय.  

मतदारसंघातील राजकीय समीकरण-पक्षांतर्गत आव्हाने, दावेदार
* कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात गृहमंत्री आर आर पाटील यांच्या विरोधात  माजीमंत्री अजितराव घोरपडे अशी  लक्षवेधी निवडणूक होणार आहे. 

* जरी  आबा विरुद्ध घोरपडे अशी लढत होत असली तरी, हि निवडणूक गृहमंत्री आर आर पाटील विरुद्ध त्यांचे कट्टर विरोधक खासदार संजय  काका  पाटील  अशी  रंगणार आहे. 

* खासदार  संजय काका पाटील यांना लोकसभेला 'तासगाव - कवठेमहांकाळ' मतदार संघातून तब्बल ३८ हजाराचे मताधिक्य मिळालंय. 

* त्यातच निवडणूक हरल्यास राजकारण सोडण्याची 'भीमप्रतीज्ञा' आबांनी केल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.