'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र... गुजरातमध्ये?'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीनंतर लगेचच कल्याणमध्येही राज ठाकरेंची सभा होणार आहे.

Updated: Oct 6, 2014, 09:07 PM IST
'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र... गुजरातमध्ये?' title=

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीनंतर लगेचच कल्याणमध्येही राज ठाकरेंची सभा होणार आहे.

भाजपच्या 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र' जाहिरातीवर टीका करताना 'गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल इथं येऊन उद्योगपतींना म्हणणार चला गुजरातकडे... आणि परत हेच विचारतायत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र' असं म्हणत राज ठाकरेंनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवरही टीका केलीय. 

'जवान सीमेवर शहीद होतायत, हे पाकिस्तानला ईदची मिठाई पाठवतायत, ते बॉम्ब पाठवताय... आणि जवान सीमेवर शहीद होतायत आणि पंतप्रधान निवडणुकीचा प्रचार करत फिरतायत... काँग्रेसच्या राज्यात तेच झालं तेच मोदींच्या राज्यात. आम्ही शहिदांसाठी रडत बसायचं' असं म्हणत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या विधानसभा प्रचारसभांचा खरपूस समाचार घेतलाय.

युती तुटण्याबद्दल भाजपवर शरसंधान साधत 'युती-आघाडी तुटणे हे पूर्वनियोजित, दोन दिवसांत चार पक्षांनी २८८ उमेदवारांचे एबी फॉर्म कसे वाटले...??? दोन दिवस बाकी असताना युती आणि आघाडी तोडून टाकली म्हणजेच हे सगळं पूर्वनियोजित होतं... हेच ते अच्छे दिन का?' असं त्यांनी म्हटलंय. यावेळी, महाराष्ट्रामध्ये भाजपला ताकद मिळाली ती बाळासाहेबांमुळे, हे सांगण्यास राज ठाकरे विसरले नाहीत. 

'भाजपकडे राज्यात नेतृत्वच नाही... भाजपला निवडणुकीसाठी स्वत:च्या पक्षात उमेदवारही मिळत नाही.... मग, इतर पक्षातून उमेदवार भाजपने आयात केले, मग तुमच्या पक्षाचं काय आहे का?' असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपमध्ये आयात करण्यात आलेल्या नेत्यांची यादी पुन्हा एकदा वाचून दाखवली. असंच सुरू राहीलं तर नगरपालिका निवडणुकांमध्येही प्रचारासाठी मोदींना यावं लागेल, असाही टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावलाय. 

एकनाथ खडसे सहा सहा तास बोलतात, विधानसभेत काय प्रवचन करतात, आस्था चॅनेलवर जाऊन बसा, एवढं करूनही टोलचा विषय कधी विधानसभेत घेत नाही, यांचे लागे बांधे आहेत... उद्या मोदी मंत्रिमंडळात शरद पवार मंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको... अशी टीकाही राज ठाकरेंनी केलीय.  

'महाराष्ट्राची पिळवणूक टोलवरून होते, आणि शिवसेना - भाजपने मात्र कधीही आंदोलनं केली नाहीत, माझे कार्यकर्ते जेलमध्ये गेले आणि वर तोडपाणी केल्याचे आरोप... या राज ठाकरेला विकत घ्यायला अजून जन्माला यायचायं' असं म्हणतानाच 'या राज ठाकरेच्या हातात सत्ता द्या... हा सगळा टोलचा झोल बंद करून टाकेन... टोलदवारे जे पैस गोळा होतायत ते सगळे कॅशमध्ये होतायत... सरकारकडे किती जातायत आणि हातोहात किती हे समजायला हवं... टोलच्या नावानं वाटमारी सुरु आहे' असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

'पत्रकार बांधवांनी माझ्यावर टीका केली, कुठे गेली ती ब्लू प्रिन्ट, मात्र ब्लू प्रिन्ट आल्यावर काहीही नाही, त्यातील कित्येकांनी वाचलीही नसेल, त्यांना रस होता राज ठाकरेवर टीका करण्यात, वाचाल तर कळेल...' असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या ब्लू प्रिंटवर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.

'शारीरिक सुरक्षिततेपेक्षा महिलांना मानसिक सुरक्षितता देण्याची आवश्यकता... महिलेच्या नावावर घर, ही योजना त्यासाठी महत्त्वाची ठरेल... मग, पुढच्या सगळ्या समस्या दूर होतील, कारण तेव्हा त्या मानसिकरित्या सुरक्षित असतील' असं म्हणत राज ठाकरेंनी महिलांच्या प्रश्नांनाही हात घालण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.