UPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग

राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे. 

Updated: Oct 14, 2014, 04:13 PM IST
UPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग title=

सायंकाळी ४.१० वाजता
कोथरूड मतदारसंघात मतदारांना पैसे वाटणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. साईनगर वसाहतीमध्ये हा प्रकार सुरू होता. अभिजित जगताप, सतीश सावंत, सुभाष शिंदे या तिघांना अटक. त्यांच्याकडून एका मतदार यादीसह 31, 100 रुपये रोख जप्त करण्यात आलेत. कोथरू़डमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्यासाठी आपण काम करत असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं. 

दुपारी ३.४५ वाजता

जळगाव अमळनेरचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आलीय.  ८० लाखांच्या रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलीय. या प्रकरणात चौधरी सहआरोपीला अमळनेर न्यायालयात हजर केले असता चौधरी यांना १८ आक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. 'प्लाझा हॉटेल'मध्ये चौधरी समर्थकांनी ८० लाखांची रोकड आणली होती. दोन आरोपींवर यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील योगेश चौधरी हा आरोपी उमेदवार शिरीष चौधरी यांच्यासोबत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठीही हजर होता. याच आधारे उमेदवार चौधरी याला सहआरोपी करून पोलिसांनी अटक केलीय 

दुपारी ३.३० वाजता

- भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातींवर शिवसेनेने घेतला आक्षेप.
- जाहिरातींवर उमेदवाराचे छायाचित्र छापण्यावर घेतला आक्षेप, शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार.
- एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांना अपात्र ठरवावे - दिवाकर रावते
- उमेदवाराचे फोटो असलेल्या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवाराच्या खर्चात समावेश करावा - दिवाकर रावते

दुपारी ३.०० वाजता

उद्या प्रत्येकाने मतदान करा, हे जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून केले मतदान करण्याचे आवाहन केलंय. 

 

दुपारी २.३० वाजता

सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंग यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

दुपारी २.२५ वाजता
रायगड - रायगड जिल्ह्यात  तब्बल ७३ जणांवर तडीपारीची कारवाई... जिल्हा दंडाधिकारी सुमंत भांगे यांनी केली कारवाई.

दुपारी १.४५ वाजता
मतदानाला काही तास उरले असताना  बनावट नोटांचा सुळसुळाट समोर... मतदानाच्या एक दिवस आधी भांडुप पोलिसांनी  १,७०,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. भांडुप पोलिसांच्या स्पेशल स्टाफनं ही कारवाई केलीय.  

दुपारी १२.५५ वाजता

सिंधुदुर्गच्या निवडणुकीला अखेरच्या दिवशी गालबोट लागलंय. काँग्रेसचे सावंतवाड़ी तालुकाध्यक्ष संजू सावंत यांच्या मोटार सायकली आज पहाटे जाळण्यात आल्यात. याबाबत परब यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केलीय.  

दुपारी १२.०० वाजता
लातूर - माजी मंत्री तथा अहमदपूर विधानसभेतील अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. यावेळी, पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय. अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

सकाळी ११.०० वाजता
सांगली-मिरजेत चार चाकी गाडीतून एक लाख ८७ हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात आलीय. संजय मुतूर आणि राहुल रामसगरे या दोघांना याप्रकरणात अटक करण्यात आलीय. तसंच अपक्ष उमेदवार सी. आर. सांगलीकर यांच्यावरही याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  निवडणूक शाखेच्या भरारी पथक आणि पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

सकाळी ९.२० वाजता

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रास मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून पैशांची पाकिटं जप्त करण्यात आली आहेत. तब्बल, ११० पाकिटांमध्ये १ लाख ६५ हजार रुपये जप्त करण्यात आलेत.

सकाळी ९.१३ वाजता

दरम्यान, अकोला पश्चिमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख आणि शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव गावंडे तसंच अकोल पूर्वचे शिवसेनेचे उमेदवार यांना निवडणूक आयोगानं पेड न्यूज संबंधी नोटीस बजावलीय. 

अकोला जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात चाललेल्या करमतींची काही आकडेवारी समोर आलीय. यानुसार आत्तापर्यंत... 
* आचारसंहितेचे एकूण ५३ गुन्ह्यांची नोंद
* निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ५ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरपर्यंत एकूण १८,१३,५०० रुपये जप्त केलेत
* तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं आचारसंहितेच्या काळात एकूण १० लाखांची अवैध दारू जप्त केलीय.

मुंबई : राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या प्रमुख पक्षांच्या जोडीला बसपा, डाव्यांसारखे छोटे पक्षही निवडणुकीच्या रणसंग्रामात आपापलं बळ आजमावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेत्यांनी या प्रचाराचा निमित्तानं आपापले शड्डू ठोकलेत. बुधवारी, सकाळी मतदानाला सुरूवात होईल आणि संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त होईल. १९ तारखेच्या रविवारी मतमोजणीमध्ये कुणाच्या पारड्यात कसलं दान पडलंय, हे स्पष्ट होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.