शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम ‘फ्री’मध्ये उपलब्ध

राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम हे फ्रीमध्ये मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Oct 29, 2014, 08:10 PM IST
शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम ‘फ्री’मध्ये उपलब्ध title=

मुंबई: राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम हे फ्रीमध्ये मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.

शपथविधी सोहळा हा सरकारी कार्यक्रम असल्यानं आम्ही त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. असं स्पष्टीकरण एमसीएचे सचिव नितीन दलाल यांनी दिलं आहे. 

महाराष्ट्रात भाजपनं प्रथमच सर्वाधिक जागांवर विजय मिळवत मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.  ३१ ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियममध्ये शाही थाटात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा जाहीर करुन भाजपाच्या मदतीला धावून येणाऱ्या शरद पवारांनी शपथविधी सोहळ्यासाठीही भाजपवर कृपादृष्टी दाखवली आहे. 

शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या एमसीएनं या सोहळ्यासाठी राज्य सरकारला वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. ही विनंती एमसीएनं मान्य केली आहे. या सोहळ्यात सुमारे ३० हजार लोकं हजेरी लावतील अशी शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सजावट करण्याची धूरा ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर अशोक हांडे यांच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अंजली भागवत या दिग्गज खेळांडूसह साहित्य आणि कला क्षेत्रातील मंडळींनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. यापूर्वी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात पडायचा. तर १९९५ मध्ये मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या युती सरकारचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.