विधानसभा निवडणुका... कुठे गेलं साहेबांचं महिला धोरण?

विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर नजर टाकली तर महिलांना समान संधी तर सोडाच परंतु महिलांच्या पदरात पुरुष उमेदवारांच्या तुलनेत एक टक्का जागा आल्याचं ढळढळीत सत्य तुमच्यासमोर येईल. 

Updated: Sep 30, 2014, 02:08 PM IST
विधानसभा निवडणुका... कुठे गेलं साहेबांचं महिला धोरण? title=
प्रातिनिधिक फोटो

पुणे : विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर नजर टाकली तर महिलांना समान संधी तर सोडाच परंतु महिलांच्या पदरात पुरुष उमेदवारांच्या तुलनेत एक टक्का जागा आल्याचं ढळढळीत सत्य तुमच्यासमोर येईल. 

पुण्यात हेच चित्र दिसतंय. पुण्यामध्ये २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, या २१ मतदार संघांमधल्या उमेदवार महिलांची संख्या पुरुष उमेदवारांच्या तुलनेच एक टक्काही नाहीय. पुण्याच्या भागात नऊ मतदारसंघांमध्ये फक्त चार मतदारसंघात महिलांना सधी मिळालीय. त्यामध्ये शिवसेनेने जुन्नरमधून आशा बुचके तर काँग्रेसनं आंबेगावमधून संध्या बाणखेले आणि खेड मधून वंदना सातपुते यांना उमेदवारी दिलीय... तर पुरंदरमधून भाजपच्या संगीताराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

इतर महाराष्ट्राच्या तुलनेत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्येही काही वेगळी स्थिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे ज्या पुण्यात आज ७६ नगरसेविका कार्यरत आहेत, त्याच पुण्यातल्या आठ विधानसभा मतदार संघामध्ये फक्त दोनच महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामध्येही पर्वतीमधून भाजपच्या विद्यामान आमदार माधुरी मिसाळ आणि कोथरुडच्या भाजपच्या नगरसेविका मेधा कुलकर्णी यांना संधी दिली गेलीय. 

मात्र, महिलांच्या विकासासाठी महिला धोरण आणल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या हिना मोमिन यांचा अर्ज पडताळणीनंतर बाद करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्येही भोसरीमधून शिवसेनेच्या सुलभा उबाळे, पिंपरीमधून मनसेच्या अनिता सोनावणे तर आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या तीनच महिला उमेदवारी देण्यात आलीय. 
 
निवडणुकीच्या प्रचारामध्ये महिलांच्या प्रश्नांवर बरंच काही बोललं जाईल, ढिगानं आश्वासनं दिली जातील, पण महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांनाही संधी मिळायला हवी, हेही तितकंच खरं..... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.