पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया....
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - अरुण गिरे
भाजप - जयसिंग एरंडे
काँग्रेस - संध्या बाणखेले
राष्ट्रवादी - दिलीप वळसे-पाटील
विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा हा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ... पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात 25 वर्षांपासून दिलीप वळसे पाटील यांनी वर्चस्व निर्माण केलंय.
वळसे पाटील तब्बल सहावेळा या मतदारसंघातून निवडून आलेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांनी शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव यांचा 37021 मताधिक्याने पराभव केला होता.
डींबा धरण, पाणी पुरवठ्याच्या योजना, वाडीवस्तीपर्यंत रस्ते, भीमाशंकर साखर कारखाना, इंजीनिअरिंग कॉलेज, शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केल्याचं वळसे पाटील सांगतात.
एकेकाळी वळसे पाटलांचेच सहकारी असलेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे आता वळसे पाटलांच्या विरोधात उभे ठाकलेत. वळसे यांच्या विकासकामांच्या दाव्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
सर्वसामान्य माणूस इथल्या राजकारणात काहीवेळा भरडला गेलाय. तर काहींना विकासकामांचा आधारही मिळालाय. त्यामुळे राजकारणाविषयी आणि इथल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीविषयी संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.
दिलीप वळसे पाटील यांच्यापुढे आव्हान उभे करण्यात विरोधक कमी पडत असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील मोदी इफेक्टमुळे यावेळची निवडणूक रंगतदार असेल असं मत व्यक्त केलं जातंय.
एकूणच या मतदार संघात लोकसभेला शिवसेनेचे शिवाजी आढळराव आणि विधानसभेला राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील असं चित्र गेल्या 10 वर्षांपासून पहायला मिळतंय. यशाचा हाच फॉर्म्युला आंबेगावची जनता यावेळी ठेवतेय की काहींना धक्का देतेये याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.