ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कर्जत

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी राष्ट्रवादीला चांगलीच फायदेशीर ठरली होती. त्यामुळेच अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदारपदी विराजमान झाले होते.

Updated: Oct 8, 2014, 04:40 PM IST
 title=

रायगड : कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी राष्ट्रवादीला चांगलीच फायदेशीर ठरली होती. त्यामुळेच अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदारपदी विराजमान झाले होते.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - हनुमंत पिंगळे
भाजप - राजेंद्र येनुकर
काँग्रेस - शिवाजी खारीक
राष्ट्रवादी - सुरेश लाड
मनसे - जे. पी. पाटील

बंडखोरीला आळा घालण्यासाठी शिवसेना यंदा तरी यशस्वी ठरणार का याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतेय.

उल्हास नदीच्या किनारी वसलेला कर्जत विधानसभा मतदार संघ. मुंबईपासून जवळ तर सेंट्रल रेल्वे लाईन हा परिसर असल्यामुळे विकेंड डेस्टिनेशन म्हणूनही कर्जतकडं बघितलं जातंय.

2 लाख 33 हजार 950 इतकी या मतदारसंघातील मतदारांची संख्या असून हा विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरेश लाड हे या मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले.

दहा हजार मतांच्या फरकाने सुरेश लाड यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा लाड यांना फायदा झाला होता. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार देवेंद्र साटम यांना परभव पत्करावा लागला होता.

आमदार सुरेश लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असल्याने सुनील तटकरे यांच्या सहकार्याने सुरेश लाड यांनी आपल्या मतदारसंघात कामे केली.

- कर्जत चौक, कर्जत- मुरबाड , कर्जत- बदलापूर , कर्जत-खोपोली या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाला सुरुवात
- कर्जत, खोपोली, माथेरान नगर परिषदेमध्ये नाट्यगृह इमारतीची उभारणी
- शॉपिंग मॉलची उभारणी
- कर्जत नगरपालिका इमारतीची उभारणी 
- खोपोली शहरात भुयारी गटार योजना
अशी विविध कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केलाय.

मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर कर्जत विधानसभा मतदारसंघ असून या परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचं विरोधकांचं म्हणनं आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात अद्यापही अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आवश्यकता आहे.
- ग्रामीण भागात मूलभूत सेवा सुविधांचा अभाव
- आदिवासींचे प्रश्न कायम
- कोंडाणे धरण रखडले
- पाली भुतवली कालव्यांचा प्रश्न कायम
- वाहतूक कोंडींने जनता हैराण
- माथेरान विकासापासून वंचीत
अशा अनेक समस्यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघाला ग्रासलं आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघाची ही विद्यमान परिस्थीती असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना  कर्जत विधानसभा मतदार संघातून २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. 

त्यामुळे यावेळीही सेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुरेश लाड यांनाचं संधी मिळालीय. शिवसेनेकडून गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढलेले शिव उद्योग सेनेचे अध्यक्ष उद्योजक हनुमंत पिंगळे यांना संधी मिळालीय. गेल्या वेळी बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला होता. यावेळी बंडखोरी होवू नये म्हणून शिवसेनेने काळजी घेतल्यास इथं काँटे की टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.