नंदूरबार : नंदूरबार विधानसभा मतदारसंघ. तब्बल चारवेळा निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी आता भाजपची वाट धरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये खरी चुरस निर्माण झाली आहे.
गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमारेषेवर वसलेल्या नंदूरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसात राजकारण ढवळून निघालंय. विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार लगावणारे विजयकुमार गावित राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तंबूत दाखल झालेत. आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदार संघातून डॉ. गावित १९९५ पासून निवडून येत आहेत.
2009 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता विजयकुमार गावित यांनी 23858 एवढ्या मताधिक्याने बाजी मारली. गावित यांना 99323 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या सुहासिनी नटावदकर यांना 75465 मतं मिळाली. नंदुरबार मतदारसंघातील विकासकामांचा विचार करता विजयकुमार गावित यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केलाय.
काय केलीत विकासकामे....
मेडिकल कॉलेज, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्षमीकरण, सिंचनाच्या विविध योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतर्गत रस्ते, जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधा, अशा अनेक योजना राबविल्याचं गावित सांगतात.
डॉ. गावित अनेक विकास कामे केल्याचं सांगत असले तरी त्यांनी दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण केली नाहीत, न केलेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम गावित करत असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करत आहेत.
काय आहेत समस्या...
नंदूरबार मतदारसंघात अनेक समस्या आजही कायम आहेत. जलसिंचनाच्या योजना अर्धवट, उच्च शिक्षणासाठी पुरेशा सोयी नाहीत,
युवकांना रोजगार नाही, उच्च शिक्षितांचे इतरत्र स्थलांतर, नवीन उद्योग आणण्यात राजकारणी अपयशी ठरले आहेत.
१५ वर्षांहून अधिक काळ मंत्रीपदी राहिलेल्या डॉं. विजयकुमार गावितांच्या कामाबाबत कुठे समाधान आहे तर कुठे नाराजी आहे. मात्र आता गावितांच्या भाजप प्रवेशाने इथली इतर राजकीय समीकरणं बदलणार हेही ओघाने आलंच...विधानसभेच्या निवडणुकीत तरुणाईचं लक्ष वेधून घेणं हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो.
नंदुरबारच्या राजकारणात डॉ. विजयकुमार गावित यांच्या बदलत्या राजकारणामुळे नवे रंग भरू लागलेत. या बदलत्या राजकीय रंगात नंदूरबारची जनता काय कौल देते, याकडेच आता सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.