लातूर : लातूर जिल्ह्यातील लक्षवेधी असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ. इथे रंगते ती नात्यांची लढाई. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातल्या या राजकीय लढाईमुळे हा मतदारसंघ राज्यभर चर्चेत असतो.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - डॉ. शोभा बेंजरगे
भाजप - संभाजी पाटील निलंगेकर
काँग्रेस - अशोक पाटील निलंगेकर
राष्ट्रवादी - बसवराज पाटील
मनसे - अभय साळुंखे
लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघात लढाई पहायला मिळते ती आजोबा आणि नातवामध्ये. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपकडून त्यांना टक्कर देणारे त्यांचेच नातू संभाजी पाटील निलंगेकर... असा हा सामना गेली काही वर्ष सातत्याने रंगतो आहे. या लढाईत 2004 मध्ये नातवाने आजोबांना पराभूत केलं होतं.
तर 2009 च्या राजकीय रणसंग्रामात आजोबांनी गेल्यावेळच्या पराभवाचा वचपा काढत नातू संभाजी पाटील यांना 'हम भी कुछ कम नही...' हेच जणू दाखवून दिलं होतं.
1962 मध्ये शिवाजीराव पहिल्यांदा आमदार झाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. 1985 ते 86 या कालावधीत ते मुख्यमंत्री झाले.
लातूर जिल्हा निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग असलेले शिवाजीराव आज 85 व्या वर्षीही राजकारणात तितक्याच उत्साहाने, हिरिरीने सक्रीय आहेत.
निलंगा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सुमारे 605 कोटी 73 लाख रुपयांची विकासकामे केल्याचा दावा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलाय.
- ग्रामीण भागातील रस्ते दूरुस्ती
- तहसिल, पंचायत समितीची ईमारत उभारणी
- ग्रामीण रुग्णालय इमारतीची उभारणी
- डोंगरगाव, तगरखेडा, औराद, सोनखेडा,
- गुंजरगा, लिंबाळामध्ये सिंचनाची कामे
आदी विकासकामे केल्याचं शिवाजीराव सांगताहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले सुपूत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांना उतरविण्याचा निर्णय घेतलाय.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी या दोघांवरही टीकास्त्र सोडलंय. ज्यांना एक कारखाना सांभाळता आला नाही, ते शेतक-यांच्या हितासाठी काय करणार असा सवाल करत त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर तोफ डागलीयं.
मनसेने निलंगेकर कुटुंबियांवर हल्लाबोल केलाय. दोन्ही निलंगेकर राजकारणात सपशेल अपयशी ठरत असल्याची टीका मनसेच्या नेत्यांनी केली आहे. निलंग्यात राजकीय घडामोडी रंजक घडत असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.
- साखर कारखाना बंद
- ऊस शेतकरी हैराण
- निलंगा शहर आणि परिसरात पाणीटंचाई
- वाढते अतिक्रमण
गेली 50 वर्ष राजकारणात आणि त्यात मुख्यमंत्रीपद मिळूनही शिवाजीराव पाटील निलंगेकर निलंगा तालुक्यात मूलभूत सोयीसुविधाही देऊ शकले नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
विविध खात्यांची मंत्रीपदं, मुख्यमंत्रीपद भूषविणारे 85 वर्षीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग आजही निलंग्यात आहे. तर दुसरीकडे युवकांचे प्रतिनिधी आणि आक्रमक नेता अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेले त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर अशीच रंगतदार लढत पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, शिवाजीरावांचे पूत्र अशोक पाटील निलंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगेल आणि यात कोण बाजी मारणार हे निवडणुकीतच स्पष्ट होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.