मुंबई: मराठी माणसाचे प्राबल्य असलेला आणि शिवसेना-मनसेमध्ये काँटे की टक्कर असणारा मतदार संघ म्हणजे मुंबईतला शिवडी मतदार संघ. त्यामुळे पुन्हा एकदा इथे वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
मुंबईच्या गिरणगावातील परळ भागाचा समावेश होत शिवडी मतदार संघ तयार झालाय. या मतदार संघावर कायम वर्चस्व राहिलंय ते शिवसेनेचं.
दगडू सकपाळ यांनी तब्बल 15 वर्ष इथे वर्चस्व गाजवत शिवसेनेला यश मिळवून दिलं. मात्र 2009 मध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला मनसेने खिंडार पाडलं.
मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी अटीतटीच्या लढतीत 6 हजार मतांनी विजयी बाजी मारली. नांदगावकरांना एकूण 64 हजार 375 तर सेनेच्या दगडू सकपाळ यांना 57912 मते मिळाली.
शिवडी मतदार संघात एकूण 2 लाख 78 हजार मतदार आहेत. त्यात सुमारे 70 टक्के मराठी लोक आहेत.
विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून स्वतः बाळा नांदगावकरच मनसेचे उमेदवार होते. मात्र तरीही सेनेला इथे तब्बल 79 हजारांची आघाडी मिळालीयं.
हा मनसेसाठी दे धक्काच म्हणावा लागेल. विधानसभा मतदार संघाचा विचार करता इथे शिवसेनेचे सहा, तर मनसेचा केवळ एक नगरसेवक आहे.
मात्र असे असूनही विद्यमान आमदार बाळा नांदगावकर यांना पुन्हा एकदा विजयाचा विश्वास आहे.
नांदगावकरांना विश्वास असला तरी शिवसेना पुन्हा एकदा इथे नव्या दमाने कामाला लागलीये. बाळा नांदगावकरांनी काहीही कामे केली नाहीत, असं टीकास्त्र सोडत ते मतदार संघातील जनतेच्या संपर्कातच नसल्याची टीका शिवसेनेचे नेते करताहेत.
सेनेकडून विभागप्रमुख अजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे.
शिवडी मतदार संघातील जनतेच्या मुख्य समस्या आहेत त्या
1) बीपीटी जमिनीवरील इमारतींचे पुनर्वसन,
2) वाढती स्थानिक गुन्हेगारी,
3) तरुणांमध्ये बेरोजगारी,
4) म्हाडा वसाहतींची दुरूस्ती
5) झोपडपट्टी पुर्नविकास
वैद्यकीय सेवा देणारे केईएम, टाटा, वाडियासारखे हॉस्पिटल्स याच मतदार संघात आहेत. मात्र मतदार संघाची प्रकृती काही ठिक नाही.
सर्वसामान्य जनतेला प्राथमिक सोयीसुविधा मिळणंही दुरापास्त झालंय. त्यामुळे जनता नाराज आहे.
जनता नाराज असली तरी त्यांना पुन्हा एकदा आपल्याचकडे आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू झालीये.
शिवसेना-मनसेतील सत्ता संघर्ष या मतदार संघात पहायला मिळेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
शिवडी मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसल्याने खरी लढत ही सेना-मनसेतच होणार असं सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.