वर्धा : जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिकाऱ्यांसह १७ जणांचा मृत्यू झालाय.
मृतांमध्ये लेफ्टनंट कर्नलसह एका कर्नलचा समावेश आहे. आग लागल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झालेत. त्यामुळे परिसरातील गावांना हादरा बसला. जवळपास १५ गावांना तातडीने रिकामे करण्यात आलेय. कॅम्प परिसरालगतच्या नागझरी भागाला आग लागली असून इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १५ गावांतील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
आग तीव्रता मोठी आहे. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत आहेत. दरम्यान, तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना याबाबत माहिती देण्यात आलेय. तर दुसरीकडे डेपो परिसरातील गावे खाली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेय.