भिवंडी: भिवंडीच्या सरकारी रुग्णालयात १८ मुलांना चुकीच्या इंजेक्शनची बाधा झालीय. रविवारी रात्री भिवंडीच्या इंदिरा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयात १८ मुलांना देण्यात आलेल्या अॅमिकासीन या इंजेक्शनची रिअॅक्शन झाल्याची घटना घडली. मुलांना त्रास होवू लागल्यानं पालकांमध्ये भीती पसरली होती. मात्र डॉक्टरांनी तत्काळ कॉन्ट्रन्स इंजेक्शन देत परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
सर्वत्र मुसळधार कोसळलेल्या पावसामुळं हवामानात बदल झाल्यानं थंडी ताप आणि न्युमोनियाची लागण झाली असून रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे . भिवंडी आणि आसपासच्या शहारातही या रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून भिवंडीच्या आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी १ ते ७ वयोगटातील ३५ मुलांना दाखल करण्यात आले आहे. काल रात्री १० वाजता रुटीन प्रमाणे ड्युटीवर असलेल्या नर्सनं यातील काही मुलांना अमिकासीन औषधाचा डोस दिला. त्यानंतर लगेचच १८ मुलांना थंडी, उलटी जुलाबचा त्रास होत त्यांचे हात पाय अखडले. यामुळं घाबरलेल्या पालकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मात्र रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी तत्काळ बालरुग्ण विभागात धाव घेत या सर्व मुलांवर उपचार सुरु केले. यातील दोन मुलांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळं त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं. सुमारे ३ तासांनतर या मुलांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याच दरम्यान या मुलांना देण्यात आलेल्या इंजेक्शनवर असलेल्या तारखा मुदतीत असलेल्या दाखवीत असल्या तरी प्रत्यक्षात या इंजेक्शनची मुदत संपलेली असावी, यामुळंच ही रिअॅक्शन झाली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांनी सदर इंजेक्शन तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच यामागच्या कारणाचा उलगडा होऊ शकेल असं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.