यवतमाळ : आर्णी तालुक्यात पुन्हा 25 बालके कुपोषित आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. एकात्मिक बालविकास यंत्रणेकडून सातत्याने पाहाणी करुन सुद्धा ही बालके आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राज्य शासनाने एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. कुपोषणात वाढ होऊ नये आणि नियंत्रित राहावे यासाठी प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून दर महिन्याला ५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींची तपासणी करण्यात येत आहे. आदिवासी आणि मागासलेल्या आर्णी तालुक्यात आर्णी, लोणबेहळ, भांबोरा, लोणी, सावळी, म्हसोला या सहा केंद्रांवर एकात्मिक बालविकास यंत्रणेकडून बालकांची नियमित तपासणी करुनही २५ बालके कुपोषणग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहाणीतून निदर्शनात आले आहे.
२५ बालके कुपोषित आणि १२५ बालके कमी वजनाची आढळल्याने संबंधित यंत्रणेच्या दृष्टीने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाचे सुमारे ३५० कर्मचारी बालकांच्या तपासणीसाठी कार्यरत असतांना कुपोषित बालकांची संख्या वाढल्याने हे प्रशासनाचे अपयशचं आहे, असा आरोप करण्यात आलाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि राष्ट्रवादीचे आमदार ख्वाजाबेग यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.