मुंबई : 'नॅशनल टेक्सटाईल कॉरपोरेशन' अर्थात 'एनटीसी'च्या मुंबईत बंद पडलेल्या तीन कापड गिरण्यांचं लवकरच पुनरुज्जीवन केलं जाणार आहे... अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. ही घोषणा करून अजूनही कित्येकांच्या मनातील 'सुकलेल्या' जखमेवर मुख्यमंत्र्यांनी फुंकर घातलीय.
अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ इथं या तीन गिरण्या सुरु केल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपूरमध्ये बोलत होते.
'एनटीसी'च्या मुंबईत बंद पडलेल्या कापड गिरण्या राज्यातच राहाव्यात अशी अट घातल्यामुळे पहिल्या टप्प्यात तीन कापड गिरण्यांना अमरावतीत हलवण्याचं ठरवलंय. भविष्यात आठ कापड गिरण्यांबद्दल निर्णय करू, अशीही आशा मुख्यमंत्र्यांनी दाखवलीय.
दरम्यान, मुंबईत कापड गिरण्या बंद करून त्या जागेचा वापर रियल इस्टेटसाठी करू पाहणाऱ्या उद्योजकांनाही राज्यात एक कापड गिरणी सुरु करण्याची अट घातली जाईल... त्याची पूर्तता केल्यानंतरच मुंबईतील कापड गिरणीची जागा रियल इस्टेट साठी वापरता येईल. लवकरच राज्य सरकार त्याबद्दल नवीन नियम बनवेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली…
नागपुरात नुकतंच 'युथ एम्पॉवरमेंट समिट' आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये, एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.