नीतेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद : कधी कुणावर संकट येईल आणि कुणाला पोलिसांची मदत लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटात असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी खास सुरक्षा अॅप बनवलंय.
नवीन वर्षात औरंगाबाद पोलीस अपडेट झालेत. नागरिकांच्या हातात असलेल्या मोबाईलवरच थेट तक्रार बॉक्स औरंगाबाद पोलीस विभागानं दिलाय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून नवीन सुरक्षा अँप सुरु करण्यात आलंय. या अॅपच्या माध्यमातून संकटकाळात नागरिकांना थेट पोलिसांची मदत घेता येईल. पोलिसांनी सुरु केलेल्या या अँपमध्ये महिलांना तात्काळ मदत देण्यासाठी खास सोय करण्यात आलीय. या अॅपला थेट नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी केलेली तक्रार थेट नियंत्रण कक्षात पोहचेल, अशी माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
औरंगाबाद सिटी पोलीस या नावाने हे अॅप उपलब्ध आहे.जीपीएसवर आधारित हे अॅप असून गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. या अँपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय देण्यात आलेत. त्यातील हेल्प नावाचं बटन दाबताच तुम्ही संकटात असल्याच नियंत्रण कक्षाला कळेल. एवढच नाही तर तुमचं नाव, तुमचं ठिकाण आणि मोबाईल नंबरचीही नियंत्रण कक्षाला माहिती मिळेल. या माहितीवरुन नियंत्रण कक्ष दामिनी पथक, टूरिस्ट मोबाईल, चार्ली आणि वाहनातून गस्त घालणाऱ्या पोलिसांना संकटात असलेल्या व्यक्तीची माहिती देईल.
मोबाईल चोरी, वाहन चोरी यांसारख्या प्राथमिक तक्रारी या अॅपद्वारे नोंदवता येणार असल्या तरी एफआयआर नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्येच जाव लागले. मात्र, छोट्या तक्रारी केल्यावर पोलीस यंत्रणा मदतीला धावणार असून त्यांची मदत घेऊन सामान्यांना संकटातून बाहेर पडता येणार हे नक्की.