पुणे : पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला सीबीआयनं अटक केलीय.
भाऊसाहेब आंधळकरनं पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. तळेगाव दाभाडेत १३ जानेवारी २०१० मध्ये सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती.
सीबीआयच्या पुण्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडं हा तपास होता. मात्र, जानेवारी २०१५ पासून हा तपास सीबीआयच्या गुन्हे शाखेकडं देण्यात आला.
आंधळकर यांच्या अटकेनंतर आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या, तसेच उद्योजकांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेट्टी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या; तसेच त्यांची प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींशी संधान साधून या गुन्ह्यातील पुरावे नष्ट केल्याचा ठपका आंधळकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना आज (गुरुवारी) शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. शेट्टी यांची जानेवारी २०१० मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास आंधळकर यांच्याकडे होता. त्यांनी या गुन्ह्यांत काही आरोपींना अटक केली होती.
शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुंड श्याम दाभाडेसह 5 जणांना या प्रकरणी अटक केली होती. मात्र त्यांच्या विरोधात कुठलेच सबळ पुरावे पोलीस मिळवू शकले नाहीत आणि आरोपींना सोडून देण्याची नामुष्की स्थानिक पोलिसांवर आली होती. स्थानिक पोलीस तपासाच्या बाबतीत दिशाभूल करत असल्याची तक्रार सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी हे सुरवातीपासूनच करत आले होते. याच पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता