गडचिरोली : गडचिरोलीचे भाजप आमदार डॉक्टर देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. शासकीय सेवेत असताना शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी डॉ. होळी यांच्यावर गुन्हा दाखल होता.
विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो मंजूर झाला नसताना डॉ. होळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकूनही आले. मात्र, त्यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर निकाल देताना नागपूर खंडपीठानं होळी यांना अपात्र ठरवत त्यांची आमदारकी रद्द केलीय.
डॉ. होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. तसेच त्यांनी सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी शकुंतला मेमोरियल संस्था देखील स्थापन केली होती आणि त्याचे ते अध्यक्ष होते. या संस्थेच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. आता ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयानं हा निकाल दिल्यामुळं भाजपला मोठा धक्का बसलाय.