भाजप आमदार महेश लांडगेंचा 'झिंगाट' गाण्यावर ठेका

पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांचं प्रस्थ सध्या चांगलंच वाढलंय. लांडगे यांच्या शहरातल्या एकेक लीला पाहील्या की याची प्रचिती येते. झिंगाट गाण्यावर  आमदार महेश लांडगे झिंगाट नाचलेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2017, 10:26 PM IST
भाजप आमदार महेश लांडगेंचा 'झिंगाट' गाण्यावर ठेका title=

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांचं प्रस्थ सध्या चांगलंच वाढलंय. लांडगे यांच्या शहरातल्या एकेक लीला पाहील्या की याची प्रचिती येते. झिंगाट गाण्यावर  आमदार महेश लांडगे झिंगाट नाचलेत. महापालिका निवडणुकांआधी भाजपमध्ये दाखल झालेत.

एकीकडे झिंगाट नाच दुसरीकडे, ट्रॅकवर गाणं. महेश लांडगे यांच्या या लीला पाहिल्यावर भोसरी मतदार संघातले सर्व प्रश्न संपले की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसं काही झालेलं नाही. भोसरी मतदार संघातल्या अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत. 

भोसरी मतदार संघातले नागरिक सर्वाधिक चिंतेत आहेत ते रेडझोनच्या प्रश्नाने. पिंपरी चिंचवडच्या आसपास संरक्षण विभागाचे कारखाने आहेत. त्याच्या ठरावीक मीटरमध्ये बांधकामं करण्यास मनाई आहे. या संरक्षित एरियातल्या रेडझोनमध्ये बांधल्या गेलेल्या घरांवर संकटाची तलवार आहे. 

भोसरीमध्ये नागरिकांना रोजच्या आयुष्यात ट्रॅफीकच्या समस्येला प्रचंड तोंड द्यावं लागतं. त्याबद्दल अजून कोणता तोडगा दृष्टीपथात नाही. भोसरीमध्ये गुन्हेगारी तर पुणे जिल्ह्यात ओळखली जाते. स्थानिक गँगच्या हाणामाऱ्या, हत्या अशा नित्यनेमाने इथे होतात त्यावर कोणताही धरबंध नाही. 

बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न अगदी केंद्रापर्यंत गाजलाय. बोपखेलवासियांना सध्या कित्येक किलोमीटर्सचा वळसा घालून यावं लागतंय. पिंपरी चिंचवडमध्ये समाविष्ट गावांचा विकासही रखडलाय. भोसरीमधला असमतोल विकास हा ही मुद्दा सध्या गाजतोय. विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न बाकी असताना आमदार महेश लांडगे मात्र झिंगाट नृत्यात मग्न आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.