शेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम

एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय

Updated: Jan 5, 2016, 01:35 PM IST
शेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम title=

औरंगाबाद : एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय

त्यामुळे मराठवाडयातील मुलींच्या लग्नाच्या चिंतेनं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात सामसूम असताना खैरेंच्या लेकीच्या लग्नात मात्र धामधूम पाहायला मिळाली. सोमवारी, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांची मुलगी प्रेरणा यांचा विवाह कर्नाटकातील बसवराज अरळीकट्टी यांच्याशी पार पडला. खैरे यांची लेक प्रेरणा यांचं शिक्षण बी.ई.आर्किटेक्ट झालेलं असुन बसवराज यांचंही शिक्षण बी.ई झालेलं आहे. बसवराज हे अमेरिकेल्या टीसीएस या कॉर्पोरेट कंपनीचे सहाय्यक सल्लागार आहेत. सोमवारी सायंकाळी औरंगाबादमधील अजंता अॅम्बेसेडर या हॉटेलमध्ये हा हायप्रोफाईल विवाह सोहळा संपन्न झाला.

नेते मंडळी उधळपट्टीतून नेमका काय संदेश देतात?

यंदा मराठवाडयातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळासारख्या महाभयंकर प्रकोपाचा शेतकरी सामना करताहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी पडल्यानं मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा ८०० च्याही पुढे गेलाय. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार न करता खैरे यांनी मुलीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांचा खर्च केलाय. विशेष म्हणजे या सोहळ्यात पाच हजार जणांची पंगतही पार पडली.

उल्लेखनीय म्हणजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा पालवे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  

 

 

पावसाभावी यंदा मराठवाडयातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची जमिनीवरच माती झाली. त्यामुळे जेरीस आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या मानेला दोर लाऊन जगाचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबाला देवाच्या पदरात सोडण पसंत केलं. थाटामाटात जाऊ दया पण नुसत्या लेकीच्या लग्नाचा विचार मनात एक सारखा गर्दी करत असल्यान मराठवाडयातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा आत्महत्या केलेल्या असताना खैरेसारख्या दिवसरात्र शेतकऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकप्रतिनिधीनं अशी उधळपट्टी केल्यान समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

गेल्यावर्षीही भर दुष्काळात राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनीही आपल्या मुलीच्या लग्नात अशीच उधळपट्टी करुन जनतेचा रोष ओढावून घेतला होता. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी जाधव यांच्यावर टीकेचे वार करत जाधव यांना हैराण केलं होत. जाधव यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांनीच आता त्यांच्यासारखे वर्तन केल्यानंतर आता न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यासंदर्भात आम्ही खैरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या लग्नात व्यस्त असल्यान त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.