चवदार तळ्यावरून विधिमंडळात गोंधळ

महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा सोमवारी विधिमंडळातही गाजला. 

Updated: Mar 28, 2016, 06:31 PM IST
चवदार तळ्यावरून विधिमंडळात गोंधळ title=

मुंबई: महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा सोमवारी विधिमंडळातही गाजला. 

20 मार्च 1927 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक क्रांतीचा नवा लढा सुरू केला. दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याचा हक्क मिळवून दिला. त्याच ऐतिहासिक घटनेच्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर, शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी चवदार तळ्याचं शुद्धीकरण केलं, असा गंभीर आरोप केला जातोय. 

ब्राम्हण पुरोहिताकडून हे कथित शुद्धीकरण करण्यात आल्यानं आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळलीय. विधिमंडळातही यावरून सोमवारी जोरदार गदारोळ झाला. 'जय भीम'च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या महिला आमदारांनी विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन, घोषणाबाजी केली.

शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. जलशुद्धीकरणाचा नव्हे, तर जलपूजनाचा कार्यक्रम चवदार तळ्यावर झाला, असा दावा त्यांनी केलाय.