नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील अलिशान फार्म हाऊस नाशिकमध्ये चर्चेचा विषय झालाय. हा महाल पाहिल्यावर छगन भुजबळ यांची श्रीमंती पाहताक्षणीच नजरेत भरते.
भुजबळ यांनी बेकायदेशीररीत्या कोट्यवधींची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई करताना त्यांच्या संपत्तीची मोजमाप सुरु केली आहे. भुजबळ फार्म हाऊस हा केवळ बंगला नाही तर एक राजेशाही महाल आहे. या महालात राजा महाराजांनाही लाजवे अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. एक एक वस्तू लाख रूपयांची आहे.
या सर्व वस्तू कुठून आणल्या असतील आणि त्याची किंमत काय असेल, असा प्रश्न खुद्द तपास यंत्रणेलाही पडलाय. या सर्व पॅलेसची किंमत काढण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शर्थ करावी लागत आहे.
भुजबळांच्या नाशिकमधील आलिशान घराचे फोटो पाहिले तर तुमचे डोळ दीपवतील. एकाहून एक सजावट केलेल्या खोल्या, दिवे आणि आकर्षक खिडक्या तुमच्या नजरेत भरतात. ही छायाचित्रही तुम्ही आतापर्यंत पाहिली नसतील, कारण या घरात अगदी मोजक्यांना प्रवेश होता.
अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याच्या संशय़ावरुन छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवर आता ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरु आहे.
त्यामुळे भुजबळांचा सध्याचा मुक्काम आर्थर रोड कारागृह, मुंबई येथे आहे.
- प्राचीन काळातील पेशवेकालीन वाड्यांचे खांब, प्राचीन संस्कृतीचे अवशेष, झाडांच्या दगडी कुंड्या, दगडात कोरलेले यक्ष यक्षिणी असलेल्या खांबांचा बंगल्यातल्या सभामंडपासाठी उपयोग करण्यात आला आहे. राजकीय कार्यालयातील सभा मंडपात लाकडी महीरप असलेला मोठा हॉल, महागडे सागवानी लाकडी खांब, त्यावरील लक्ष वेधून घेणारी नक्षी त्याची किंमत सांगून जाते.
- या व्यतिरिक्त राजमहालाला लाजवेल असा दिवाण ए खास, सागवानी लाकडी खुर्च्या, भव्य बैठक खोली, सभागृह, दूर्मिळ सिलिंग फॅन्स पाहणा-याला अक्षरशः थंडगार करतात.
- विशेष म्हणजे दुर्मिळ इतिहासकालीन वस्तूंचा संग्रह एखाद्या म्युझियमची आठवण करून देतो. पेशवेकालीन आणि आधुनिक शैलीतील वास्तूशास्त्राचा आभास प्रत्येक ठिकाणी येतो. चंद्राई आणि राम या बंगल्यातील शयनगृह आपल्याला वैभवाची आठवण करून देतात.
- वातानुकुलित बंगल्यात आंतरराष्ट्रीय जॅकुझीसह स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, बॅटमिंटन कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट अशी क्रीडा सुविधांची रेलचेल अक्षरशः थक्क करून टाकते.
या महालाची किंमत काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांना, पुरातत्व विभागाच्या लोकांना पाचारण करण्यात आलंय. या संपत्तीची मोजदाद करण्यासाठी आणखी किमान दोन आठवडे लागू शकतात. आता या सर्व आलीशान राजेशाही थाटामुळे प्रशासनाला तोंडात बोटं घालण्याची वेळ आली आहे.