नागपूर : राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.
विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान परिषदेचे कामकाज नऊ मार्चपर्यंत स्थगित केले. राष्ट्रगीत न झाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणी सभापतींविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे परिषदेचे सभागृह नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणालेत.
सत्ताधाऱ्यांनी सभापतींच्या दालनाबाहेर याविरोधात गोंधळ घातल्यानंतर रामराजे निंबाळकर यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू करून राष्ट्रगीत लावण्यास सांगितले आणि पुन्हा कामकाज तहकूब केले. सभापतींच्या या कृतीविरोधातही खडसे यांनी आक्षेप घेतला. सभापतींनी कोणत्या अधिकारात पुन्हा कामकाज सुरू केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अधिवेशन कामकाजाचा शेवट हा राष्ट्रगीताने होण्याचे संकेत आहेत. मात्र, आज दिवसभर विधान परिषदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही मंत्र्यांच्या उत्तरांवेळी गोंधळ घातला. त्यातच दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सभापतींनी लक्षवेधी सूचना, मंत्र्यांची लेखी भाषणे पटलावर ठेवण्यास सांगितले आणि कामकाज नऊ मार्चपर्यंत स्थगित केले.
सत्ताधारी सदस्यांनी सभापतींच्या दालनाबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आम्ही सभापतींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण सुरू असताना विरोधकांच्या गोंधळामुळे तालिका सभापतींनी विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करायचे नाही, असा संकेत आहे. मात्र, हा संकेत पाळला गेला नाही.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाले होते. विरोधकांनी व्हेलमध्ये घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
दरम्यान, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार सुनील तटकरे यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली. घोषणा देणे हा विरोधकांचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करायला नको होते, असे त्यांनी सांगितले.