अल्पवयीन वधुनं लग्नमंडपातच केला आत्महत्येचा प्रयत्न

तिला शिकायचंय... खूप मोठं व्हायचंय... पण, तिच्या पालकांना मात्र पाहायचाय तिचा भरलेला संसार... अशा दुहेरी विचारचक्रात अडकलेल्या एका अल्पवयीन वधूनं भर मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 

Updated: Dec 19, 2014, 02:54 PM IST
अल्पवयीन वधुनं लग्नमंडपातच केला आत्महत्येचा प्रयत्न title=

उल्हासनगर : तिला शिकायचंय... खूप मोठं व्हायचंय... पण, तिच्या पालकांना मात्र पाहायचाय तिचा भरलेला संसार... अशा दुहेरी विचारचक्रात अडकलेल्या एका अल्पवयीन वधूनं भर मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 

घाटकोपर इथं राहणाऱ्या या मुलीचं आणि तिच्या मोठ्या बहिणीचं नुकतंच लग्न ठरवण्यात आलं होतं. उल्हासनगर इथं राहणाऱ्या दोन तरुणांशी या दोन बहिणींचं एकाच दिवशी लग्न होणार होतं...  उल्हासनगरमधल्या हिरा मेरेज लग्नमंडपात वऱ्हाडी मंडळी जमली होती...  दुपारी २ वाजता लग्न पार पडणार होतं... मंडपात या मुलीच्या मोठ्या बहिणीचं लग्न पार पडलं तेव्हा ती तिच्याच बाजुला बसली होती... यानंतर, आपणंही बहिणीप्रमाणेच आपल्या नवरदेवासह अग्निचे फेरे घेणार हे तिला माहीत होतं... पण, तिच्या मनाला मात्र हे पटत नव्हतं... 

कारण, तिला शिकायचं होतं... तिनं या विवाहाला आपला नकारही दर्शवला होता. पण, काचा वेचून कुटुंब चालवणाऱ्या तिच्या वडिलांना मात्र आपल्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं होतं... नाईलाजास्तव तिला या विवाहाला होकार द्यावा लागला.

लग्नमंडपात मोठ्या बहिणीचा विवाह पार पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे लहान बहिणीचं लग्नाची घटिका समिप आली होती... पण, त्याचवेळी या अल्पवयीन वधुनं आपल्याला बाथरुममध्ये जायचंय, असं सांगितलं. आणि तिथून निघून गेली... बाथरुममध्ये जाऊन परिस्थितीपुढे हताश झालेल्या या मुलीनं फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर ती बाहेर आली पण लग्नमंडपातच कोसळली. तिला तातडीनं सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं... 

पोलिसांच्या चौकशीत तिनं सध्या आपण दहावीत शिकत असून आपल्याला पुढेही शिक्षण घ्यायचंय... पण, जबरदस्तीनं हे लग्न ठरवण्यात आल्यानं आपण हे पाऊल उचलल्याचं पोलिसांना सांगितलं... आणि या बालविवाहाचं भांडं फुटलं...

दरम्यान, लहान मुलीनं आत्महत्येचं पाऊल उचलल्यानं मोठ्या बहिणीलाही तिच्या सासरच्या मंडळींनी घेऊन जाण्यास नकार दिलाय, असं या मुलींच्या वडिलांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.